पान ९


इकडे निराश हुन कसाबसा आपल्या महालात पोहोचला पण त्याला चैन पडेना. आपण मोईचा विश्वासघात केला आहे, ही भावना त्याचं मन कुरतडू लागली. त्याच्या खांद्यावरची जखम पाहून त्याच्या पिताश्रींनी, सरदार झाओने त्याला प्रश्न विचारले पण हुनने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तो सरळ आपल्या शयनकक्षात निघून गेला आणि मलमपट्टी करून शांत पडून राहिला.

मोई आत्ता काय करत असेल याचा विचार करता करता, मोईसोबत घालवलेले कित्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहिले. इकडे मोईचीही अवस्था काही निराळी नव्हती. रात्री झोपेऐवजी तिच्या डोळ्यांतही हुनच्याच आठवणी जमा झाल्या होत्या.

“तुंग, तू मला सोडून नाही ना रे जाणार?” मोईने त्याला विचारलं होतं.

“चल, वेडी आहेस का? अंग मी तर तुला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे.” हुनने तिच्या कमरेभोवती आपल्या हातांचा विळखा घालत म्हटलं.

“खरंच! पण कधी रे होईल असं?”

“आत्ता! अगदी या क्षणी!” असं म्हणून हुनने आपली मिठी घट्ट केली. मोईला त्या मिठीत इतकं सुरक्षित वाटत होतं की आता सर्व जग जरी तिच्याविरुद्ध गेलं तरी सामना करण्याची तयारी होती तिची. तिने डोळे उघडून पाहिलं तर हुन तिच्या चेहे-याकडे एकटक पहात होता.

“काय पहातोयंस?” त्याच्या डोळ्यात बघत तिने विचारलं.

या वेळी मात्र हुनने बोलण्यापेक्षा कृतीवर भर दिला. मोईचे ओठ त्याच्या ओठांमधे बद्ध झाले. ’ओह तुंग’ असं म्हणत मोई त्याला अधिकच बिलगली. मिटलेल्या डोळ्यांपुढे तिला तुंगचाच चेहेरा दिसत होता.

मोईने डोळे उघडले. डोळ्यांसमोरचा अंधार पाहून ती वास्तवात आली. तुंगचं प्रेम म्हणजे आपल्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं आणि तुंग म्हणजेच सरदारपुत्र हुन, हे वास्तव स्विकारताना तिला खूप जड जात होतं. आपल्या हुंदक्याच्या आवाजांनी बाबांना जाग येऊ नये म्हणून तोंडावर हात दाबून मोईने रडून घेतलं.

त्याला मिंगची आठवण झाली. मोईच्या बोलण्यात ब-याचदा मिंगचा उल्लेख असायचा आपलं गुपित फक्त मिंगलाच माहित आहे, असं ती म्हणाल्याचंही त्याला आठवत होतं. आता शेवटचा उपाय म्हणून मिंगचीच मदत घ्यावी असं त्याने ठरवलं.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------