पान ८


आतापर्यंत सर्व हुनने ऐकून घेतलं पण शेवटचं वाक्य त्याच्या सहनशक्तीपलिकडचं होतं. तो तिरीमिरीने उठला आणि त्याने फेईच्या पोटात लाथ मारली. फेई भेलकांडत मागे पडला तशी हुनने फेईच्या हातातील तलवार हिसकावून घेतली आणि तो फेईवर वार करणार इतक्यात त्याने मोईचं आक्रंदन ऐकलं.

मोई मानेने ’नाही नाही’ म्हणत मागे मागे सरकत होती. अश्रूंनी तिचा संपूर्ण चेहेरा भिजला होता. हुन तिच्या जवळ जाण्यासाठी पुढे गेला पण मोईने सरळ पाठ वळवली आणि ती आपल्या घराच्या दिशेने पळत सुटली. दु:ख व्यक्त करावं की राग हेच हुनला कळेना. त्याने झाडाच्या बुंध्यावर जोरात एक ठोसा मारला. या सर्वाला कारण असलेला फेई मात्र हुनचा डोळा चुकवून पळून गेला होता.

तिरस्कार वाटू लागला. ही घटना घडल्याला काही क्षणच झाले होते. जखम ताजी होती, मग रक्त भळभळल्यावाचून कसं राहील?

“नाही बाबा. मला माझी फसवणूक करून घ्यायची नाही. मला मुळी लग्नच करायचं नाही”, असं म्हणून मोई पुन्हा आतल्या खोलीत गेली. आत्ता, या क्षणी मोईची समजूत काढणं कठीण आहे, हे मोईच्या वडीलांना कळून चुकलं. ते पुन्हा आपलं काम हाती घेणार इतक्यात मिंगने बाहेरून मोईला हाक मारली.

“मोई आत आहे. तू आतच जा,” असं म्हणून मोईच्या वडीलांनी मिंगला आत जायला वाट मोकळी करून दिली. मिंगने आत जाऊन पाहिलं तर मोई तोंडावर हात दाबून गुपचूप रडत होती. मिंग तिच्याजवळ बसली आणि मोईला जवळ घेतलं. थोडा वेळ मिंग तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. मोईला त्या सांत्वनाने खूप बरं वाटलं. तिने स्वत:हून मिंगजवळ आपलं मन मोकळं करण्याचं ठरवलं.

“बाबा, तुमची परवानगी असेल, तर मी थोडावेळ मिंगकडे जाऊन येऊ का? तिचं काही काम आहे माझ्याकडे.” मोईने बाहेर येऊन आपल्या वडीलांना विचारलं.
“जा. पण लवकर परत ये हं. तिन्हीसांजा उलटून गेल्यात. रात्रीचं एकट्या मुलीने फार वेळ बाहेर राहू नये.”
“हो बाबा. मी लगेच परत येते”, असं म्हणून मिंगचा हात धरून मोई घराबाहेर पडली. मोई काही बोलणार इतक्यात मिंगच म्हणाली, “मोई, फेई स्वत:च्याच घरात तुझ्यावरून कुणाला तरी शिवीगाळ करतो आहे. मोठमोठ्याने ओरडतोय. त्याचा आवाज इतका मोठा होता की माझ्या घरातूनही मला स्पष्ट ऐकू आला.”

हे ऐकल्यावर मोईने सर्व घडला प्रकार मिंगला सांगितला. मिंग ते ऐकून खूप चकित झाली. पण त्यांना जास्त वेळ बोलता आलं नाही. एकतर मोई वडीलांना ’लगेच येते’ म्हणून सांगून बाहेर पडलेली, त्यात फेई अजूनही रागात होता. न जाणो त्याने मोईला रस्त्यातच गाठल तर! त्यापेक्षा मोईने घरीच वडीलांसोबत असलेलं चांगलं म्हणून मिंग आणि मोईने तिथेच एकमेकींचा निरोप घेतला आणि त्या आपापल्या घराच्या दिशेने वळल्या.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------