पान ७


मोई नेहमीप्रमाणे हुनची वाट पहात होती तितक्यात तिच्या पाठलाग करत फेई तिथे पोहोचला. सावकार ताओ आपल्या श्रीमंतीच्या जोरावर नेहमीच आपल्या उद्धट मुलाची बाजू घेऊन बोलायचा. फेईच्या छेडछाडीला मोईच्या वडीलांनी चांगलंच प्रत्युत्तर दिल्याने फेईचा मोईवर रागच होता. ’काहीही करून ह्या गर्विष्ठ मुलीला आपलंसं करायचंच. एकदा नाक कापलं की बरोबर पायाशी लोळण घेईल’, असा घातकी विचार करूनच फेईने मोईचा पाठलाग केला होता. ती पाठमोरी असताना फेईने तिचे डोळे आपल्या हातांनी झाकले.

“हे रे काय तुंग? किती वाट पहायची?” असं खोट्या खोट्या रागाने म्हणून मोईने आपल्या डोळ्यांवरचे हात दूर केले. वळून पाहिल्यावर तिला फेई दिसला. त्याला पाहूनच तिच्या उरात धडकी भरली.


फेई उपरोधाने हसला. “तू तिच्याशी विवाह करणार आहेस? खरं सांगतोस? कोणत्या नावाने विवाह करणार आहेस? सेवक तुंग म्हणून की सरदारपुत्र हुन म्हणून? तुला काय वाटलं, त्या समारंभात तूच एकटा हिच्यावर नजर ठेवून होतास. मीही होतो तिथेच. तुझ्या नजरेत हिच्याबद्दल काय भाव होते, ते मला तेव्हाच समजलं होतं.”

फेईने असं म्हटलं मात्र, हुनच्या चेहे-यावरचे हावभावच बदलले. मोईदेखील हुनकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहून लागली. मोईकडे पहाताना हुन फेईचं अस्तित्वच विसरून गेला. मोईच्या डोळ्यात त्याला दु:ख, वेदना, अविश्वास अशा असंख्य भावनांचं मिश्रण दिसलं. त्या संधीचा फायदा घेऊन फेईने हुनच्या हातातील तलवार हिसकावून घेतली आणि हुनच्या खांद्यावर एक जोराचा वार केला. हुन खाली कोसळला.

“मोईला आपल्या बाजूने वळविण्याची हीच ती संधी आहे…” फेईने विचार केला. “तुला माहीत नाही मोई, हा सरदारपुत्र हुनचा खास सेवक तुंग नाही. हा खुद्द सरदारपुत्र हुन आहे! तुला वाटतं तसा हा दरमहा वेतन घेणारा गरीब सेवक नाही, तर गाद्यागिरद्यांवर लोळणारा एक श्रीमंत खोटारडा आहे. मी जर दोन-तीन दिवस तुझा आणि ह्या खोटारड्याचा पाठलाग केला नसता, तर आज हे सत्य मला तुला कधीच सांगता आलं नसतं.”

मोई अजूनही अविश्वासाने हुनकडे पहात होती. मोईची ती नजर हुनला खूप अस्वस्थ करत होती. खांद्यावर झालेल्या वाराच्या वेदनेपेक्षाही त्याला मोईच्या नजरेने जास्त यातना होत होत्या. फेईने आगीत आणखी तेल ओतलं.

“मोई, माझी मागणी झिडकारलीस. एक श्रीमंत म्हणून माझा तिरस्कार केलास पण शेवटी तू काय केलंस? तूसुद्धा आपलं सर्वस्व एका श्रीमंतालाच देणार होतीस ना? अगं, मग मी काय वाईट होतो? मी निदान खरं बोलत होतो तुझ्याशी. पण ह्याने तर किती मोठं सत्य दडवलं तुझ्यापासून. तुझ्या भावनांशी खेळला हा. अगं, हा तर तुला फसवून सोडूनच देणार होता....”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------