पान ६


मोई दिसेनाशी झाली आणि हुन उठला, त्याने तो कागद उलगडून वाचला. मोईने त्याला दुस-या दिवशी सकाळी भेटायला बोलवलं होतं, तेही नेहमीच्या वेळेपेक्षा थोडंसं आधी! हुनचा विश्वासच बसेना! त्याने पुन्हा पुन्हा तो कागद वाचून पाहिला. तो कागद हातात धरुन नाचत नाचत आपल्या प्रासादापर्यंत जावं इतका तो आनंदित झाला होता. पण दुस-याच क्षणी तो पुन्हा उदास झाला.

“इतके दिवस इथे येऊन बसतो आहे. पण तिने माझ्याकडे कधीच पाहिलंही नाही आणि आज ही चिठ्ठी! कुणास ठाऊक, ती ’हो’ म्हणतेय की....” हुनने दूर कुठेतरी पहात स्वत:शीच म्हटलं.“खरंच मोई. तुला ज्या दिवसापासून पाहिलं, त्या दिवसापासून केवळ तुझाच विचार केला मी. तुला सारखं पहात रहावं असं वाटायचं. म्हणून तर रोज सकाळी इथे येण्याची सवयच लागली मला.”
“पण तुंग, आपल्याला नेहमी इतक्या सकाळी भेटता येणार नाही. माझ्या मैत्रीणींना, माझ्या बाबांना कधीतरी माझा संशय येईल.”
“तर मग आपल्या भेटीची वेळ निराळी ठेवावी लागेल.”
“मी सांगते. दर दोन दिवसांनी संध्याकाळी मी तान फू व्यापा-याच्या घरी सूत आणायला जाते. तिकडे कितीही वेळ जाऊ शकतो. तान फूचं घर गावाच्या एका टोकाला आहे. सूत घेऊन झालं की मी गावाबाहेरच्या सर्वात मोठ्ठ्या झाडामागे भेटत जाईन. ती वेळ आपल्या भेटीसाठी सर्वात योग्य वेळ आहे.”
“छान! मग तर प्रश्नच मिटला.”

हुन आणि मोईने अशा त-हेने आपल्या भेटीचे ठिकाण आणि वेळ निश्चित केली. त्यांच्या या गुप्त भेटींची खबरबात कुणालाच नव्हती. नाही म्हणायला मोईची मैत्रीण मिंग हिला सर्व ठाऊक असायचं पण मिंगने याची वाच्यता कुठेच केली नव्हती.

जसजशा मोईसोबत भेटी वाढू लागल्या तसतशी हुनच्या मनात मोईबद्दलची अभिलाषा आणखीनच बळावू लागली. पण एकीकडे त्याचं मन त्याला खात होतं. मोई त्याला हुनचा खास सेवक तुंग म्हणून ओळखत होती. तिला जर तो सरदारपुत्र हुन आहे, हे कळलं असतं तर ती त्याचा तिरस्कारच करू लागली असती. मोईशी विवाह करण्याच्या निश्चयावर हुन अगदी ठाम होता. मोईनेही त्याला विवाहाच्या बाबतीत दोन-तीनदा छेडलं होतं. पण खरं सांगितलं तर विवाह होणार नाही आणि खोटं सांगून विवाह करता येत नाही अशा द्विधा मन:स्थितीत हुन अडकला होता. हा तिढा कसा सोडवायचा, हेच त्याला कळत नव्हतं. मोईला खरं सांगून मोकळं व्हावं असं त्यालाही वाटत होतं, पण ते खरं तिला अशा पद्धतीने कळेल, असा विचार त्याने कधीच केला नव्हता.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------