पान ५


मनासारखा जीवनसाथी न मिळाल्यास अविवाहित राहण्याचा निर्धार करणा-या मोईला हुन भेटला. त्याला ती तुंग म्हणून ओळखत होती. आपल्या घरात पलंगावर पडल्या पडल्या मोई तुंगचाच विचार करत होती. पहिल्या भेटीतच तिला तो आवडला होता. त्याचा स्पष्टवक्तेपणा, तिच्यावरचं प्रेम व्यक्त करणं, तिच्या नकाराचाही आदर करणं, हे सगळं सगळं तिला खूप आवडलं होतं. उतावीळपणे ती त्याला दुस-याच दिवशी होकार देणार होती. पण एक आठवड्याची मुदत तिनेच मागून घेतली होती. तेव्हा असं अधीर होणं बरं दिसलं नसतं. हुनकडून मागितलेली मुदत संपली की त्याला होकार द्यावा, असं मोईने ठरवलं.


“हे बघ मोई, आपली नदीवर जाण्याची वेळ ठरलेली असते. म्हणून तर तुंग सुद्धा त्याच वेळी येऊन बसतो. एक करता येईल. तू ठरलेल्या वेळेच्या आधी जर तुंगला भेटलीस तर कुणालाच कळणार नाही.” असं म्हणून मिंगने मोईला एक युक्ति सांगितली. मोई त्या युक्तीवर इतकी खुश झाली की तिने मिंगला मिठीच मारली. त्यावर मिंगनेही तिची चेष्टामस्करी केली.

“बास, बास, बाईसाहेब. हे सर्व त्या तुंग महाशयांसाठी राखून ठेवा.”

मोईने हे ऐकलं आणि ती लाजून बाहेर पळाली.

दुस-या दिवशी मोईला अपेक्षेप्रमाणे तुंग नदीकिनारी बसलेला दिसला. तिने नेहमीसारखंच त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि पुढे झाली. सर्वजणी पाणी भरत असताना तिने अचानक मागे वळून पाहिलं. तुंग तिच्याचकडे पहात होता. मोईने झटकन आपल्या अंगरख्यातून एक कागद व दगड काढला आणि कागदात दगड बांधून तिने तो किना-यावर फेकून दिला. तुंगकडे एक कटाक्ष टाकून ती पुन्हा आपल्या सॉन्गमधे पाणी भरू लागली. तुंगने तो फेकलेला कागद पाहिला होता पण तो कागद केवळ आपल्यासाठीच आहे, याची त्याला कल्पना आली होती. इतर कुणासमोर तो कागद उचलला असता, तर मोईचं गुपित फुटलं असतं. त्यामुळे चेहे-यावर कोणतेही भाव न आणता, तो तसाच बसून राहिला. मोई नेहमीप्रमाणे पाणी भरून आपल्या मैत्रीणींसोबत निघून गेली.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------