पान ४


“मग आता तर तुला कळलं ना की मी कुणी श्रीमंत नाही. आता तरी करशील ना माझ्या प्रेमाचा स्वीकार?” हुन ने विचारलं.

मोईला काय उत्तर द्यावं ते कळत नव्हतं. ती नुसतीच खाली मान घालून उभी राहिली.

“मला तर तुमचं नावही माहीत नाही.” तिने हळूच म्हटलं.

“तुंग.... माझं नाव तुंग आहे.” हुन ने हसत म्हटलं. तो मोईच्या चेहे-यावरचे हावभाव निरखत होता.

“मला इतक्या लगेच विचार नाही करता येणार. मी तर तुम्हाला पुरतं ओळखतंही नाही. मला विचार करायला एक आठवड्याचा अवधी द्या.” त्या अवघड प्रसंगातून्स सुटका करून घेण्यासाठी मोईने मुद्दाम अडचण उभी केली.

“जरूर! तुला माझ्याबद्दल हवी असलेली माहिती, मी आत्ताही सांगायला तयार आहे. मी अविवाहित आहे. राजपुत्र हुनच्या खास सेवकांपैकी मी एक आहे त्यामुळे मला राजमहालातच रहावं लागतं. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालावा, इतकं वेतन मला नक्कीच मिळतं. माझे वडीलच माझ्यासाठी आई आणि वडील दोन्ही आहेत. मला भाऊ-बहिण नाहीत. मला निरनिराळ्या युध्दकला येतात. शिवाय मी चित्रही काढू शकतो.” हुनने एका दमात आपली माहीती सांगितली. मोई त्याच्याकडे एकटक पहात होती.

“आणखी काही माहिती हवी आहे?” हुनने विचारलं.

मोईने नुसतीच नकारार्थी मान हलवली. ”आता काय नवीन अडचण सांगावी बरं?” ती विचार करत होती.

“मग एका आठवड्यानंतर तुझं उत्तर होकारार्थी असेल, अशी अपेक्षा करू?” हुनने तिच्याकडे पहात मिस्किल स्वरात विचारलं.

मोईने काहीही उत्तर न देता मान खाली घातली. हुन जाण्यासाठी वळला.

“.... आणि जर उत्तर नकारार्थी असेल तर....?” मोईने मुद्दामच विचारलं.

क्षणार्धात हुनच्या चेहे-यावरचं हास्य नाहीसं झालं, त्याच्या चेहेरा उदास झाला.

“....तर.... तर काय? माझं दुर्भाग्य! पण काळजी नको करूस. तू नकार दिलास तर तुला माझ्याकडून काहीच त्रास होणार नाही. तुझ्या इच्छेचा आदर करणं हे देखील प्रेमच आहे माझं.” इतकं बोलून झपाझप चालत वळणावरुन दिसेनासा झाला.

आपल्या पत्नीच्या मताचा आदर करणारा असावा अशी तिची अपेक्षा होती. तिच्या नातेवाईकांना मोईची ही अपेक्षा म्हणजे जरा अतिच वाटायचं. पण मोईने ठरवलं होतं, ’लग्न करेन तर अशाच तरूणाशी, नाही तर आयुष्यभर अविवाहित राहीन.”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------