पान ३


मोईने एका हाताने त्याचं डोकं वर उचलून दुस-या हाताने थोडसं पाणी त्याच्या तोंडात घातलं. इतक्या जवळून मोईला पाहण्याची हुनची ही पहिलीच वेळ होती. त्यात मोईच्या नरम तळव्याचा स्पर्श त्याच्या ओठांना झाला. त्या स्पर्शाने अंगात जणू विज सळसळल्यासारखं वाटलं त्याला. त्या उत्तेजनेत त्याने पटकन पाणी गिळलं आणि त्याला जोराचा ठसका लागला.

“अरे, बापरे. हा प्रवासी तर खूपच आजारी दिसतो आहे.” मोईने घाबरलेल्या स्वरात आपल्या मैत्रीणींकडे पहात म्हटलं.

“गावातून याच्यासाठी मदत मागवायला हवी.” मोईची लिन नावाची मैत्रीण म्हणाली आणि ती गावाच्या दिशेने जायला वळली.

आता जर आपण बोललो नाही, तर आपलं भांडं फुटेल हे ओळखून हुन ताबडतोब उठून बसला व त्याने लिनला थांबवले.

“थांबा, थांबा! मी ठिक आहे.” हुन आपले कपडे झटकत उठला.


“मोई.... मी.... कसं सांगू तुला? माझं .... माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुला पहाताक्षणीच मी वेडा झालो. तुझ्याशिवाय काहीच सुचत नाही मला. सतत तूच माझ्या डोळ्यांपुढे असतेस. आज जर तुला पहाता आलं नसतं तर मी खरंच जीव दिला असता. माझ्या आयुष्याच्या प्रवासात तू माझी जीवनसाथी बनावंस अशी माझी इच्छा आहे.” हुनने व्याकूळ स्वरात म्हटलं.

“पण माझं तुमच्यावर प्रेम नाही. मी आज तुम्हाला प्रथमच पहाते आहे. तसंही, मला कुणा श्रीमंताचं प्रेम नको आहे. आपल्या पैशाचा तोरा दाखवून, प्रेम विकत मिळत नसतं म्हटलं.” मोईने फणका-याने म्हटलं.

हुनला हेराचे शब्द आठवले.

“मोईला श्रीमंत लोकांबद्दल किंचितसा आकसच आहे.”

आपलं खरं रूप उघड करण्यासाठी काहीकाळ थांबावं लागेल, हे हुनने ओळखलं.

“हा, हा, हा! कुणी सांगितलं मी श्रीमंत आहे म्हणून?”

“तर मग त्या समारंभात काय करत होतात तुम्ही?” मोई अजूनही रागातच होती.

“समारंभात तूही होतीस. तू श्रीमंत आहेस का?” हुनने तिच्याकडे रोखून पहात हसत विचारलं.

“म्हणजे...”

“म्हणजे, मी त्या समारंभाला उपस्थित होतो, पण मी अतिथी नव्हतो, तर काम करायलाच आलो होतो. सरदारपुत्र हुनचा मी खास सेवक आहे. म्हणून मी त्यांच्याचबरोबर तिथे आलो होतो.”

“असं आहे होय. मला वाटलं....” मोईच्या रागाचा पारा खाली आला.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------