पान १४


हुन तिच्यासोबत पलंगाजवळ आला. पलंगावरची पांढरी सॅटीनची चादर पाहून मोई जागच्या जागीच थांबली. हुनला ती अस्वस्थ आहे, हे कळत होतं पण त्यामागचं कारण त्याच्या लक्षात येत नव्हतं.

“खूप अवघडल्यासारखं होतंय का, मोई?” हुनने तिला विचारलं.

“अं? हो ना!” मोईने बळेच हसून उत्तर दिलं.

“बरोबर आहे. आज या घरात तुझी ही पहिलीच रात्र. असं वातावरण तू कधी पाहिलेलं नाहीस ना, म्हणून थोडं वेगळं वाटत असेल. शिवाय हे जड दागिने, कपडे....” असं म्हणून हुनने तिला पलंगावर बसवलं. हळूच तिच्या केशरचनेत गुंफलेला मोत्यांचा सर व फुलं काढली आणि मोईचे केस मोकळे केले. मोई आणखीनच अवघडली.

“मोई, या लाल पोशाखात तू खूप सुंदर दिसते आहेस.” हुनने तिला जवळ घेत म्हटलं. मोईने हुनचा हात बाजूला केला आणि ती उठून उभी राहिली. हुनने तिच्या कमरेला मागून विळखा घातला आणि तो मोईच्या कानात कुजबुजला, “मोई आजची रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र आहे. तुझ्यासारखी स्त्री माझी अर्धांगिनी बनली आहे. मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटतोय.”

आता मात्र मोईला रडू फुटलं. बेचैन होऊन तिने आपला खालचा ओठ दातांखाली घट्ट दाबला. तिचं रडणं ऐकून हुनने तिला आपल्या दिशेने वळवलं. तिच्या डोळ्यांत पहात त्याने विचारलं, “काय झालं मोई. तुला कसला त्रास होतोय का? माझं काही चुकलं का?” मोईने मानेनेच ’नाही’ म्हटलं.

“मोई, तू माझ्यापासून काही लपवतेयंस का?” हुनने गंभीर स्वरात विचारलं.

आता जर आपण बोललो नाही, तर हुनचा गैरसमज होईल म्हणून मोईने सांगायचं ठरवलं.

मोई भान हरपून हुन काय करतो ते पहात होती. हुनच्या चेहे-यावर शांत हास्य होतं. रक्ताचा तो थेंब त्याने पलंगावरील सॅटीनच्या चादरीला हलकेच पुसला. त्याने पुन्हा मोईकडे पाहिलं.

“बस! झालं समाधान? आता तर दासींच्या मनात काही शंका उत्पन्न होऊन त्या चर्चा करणार नाहीत ना? आता तर माझ्या बाहूंच्या उशीवर तुला शांत झोप लागेल ना?” हुनने स्मितहास्य करत विचारलं.

मोईच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. हुनने आपले दोन्ही बाहू पसरून मोईला आपल्या दिशेने येण्यास खुणावलं. मोई धावतच त्याच्या मिठीत शिरली. ती अजूनही रडत होती. हुनने तिचं चुंबन घेतलं आणि म्हणाला, “मोई, तुझ्या अश्रूंनी आज या चुंबनालाही चव आली आहे. एरव्ही हे चुंबन गोड गोड वाटायचं. आज त्याला एक वेगळीच लज्जत आली आहे.” मोईने लाजून मान खाली वळवली.

“मोई, आपलं आयुष्य असंच लज्जतदार करायचं आहे आपल्याला. मी म्हटलं होतं ना, तुझ्या मताचा आदर करणं हे देखील प्रेमच आहे माझं. मी सदैव तुझ्यासोबत राहीन. तुझं काही चुकलं तर तुला सावरायला, तुला दिशा दाखवायला, मी नेहमी सोबत असेन. माझ्या आनंदात, दु:खात सहभागी होशीला ना मोई?”

मोईने होकारार्थी मान डोलावत म्हटलं, “होय हुन. मी सदैव तुमच्यासोबत असेन.”

हुनने आपल्या हातांनी पलंगावरची सॅटीनची चादर बाजूला काढून फेकली आणि तो मोईला आपल्या बाहुपाशात घेऊन विसावला. त्याच्या सुरक्षित मिठीत मोई केव्हा गाढ झोपी गेली हे तिचं तिलाही कळलं नाही.


----- समाप्त -----

----- या कथेवरील अभिप्राय / प्रतिक्रिया येथे नोंदवाव्यात. -----

Share this post:

1 comments

  1. Kanchan Karai // May 13, 2012 at 11:10 PM  

    ही कथा या ब्लॉगवर येथून पुन:प्रकाशित करण्यात आली आहे. या कथेवर पूर्वी मिळालेल्या प्रतिक्रिया येथे वाचता येतील.

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------