पान १२


मोई स्तिमित होऊन मिंगचं बोलणं ऐकत होती. इतका गहन विचार तर तिने केलाच नव्हता. हुन श्रीमंत आहे आणि आपल्याशी संबंध वाढवण्यासाठी तो खोटं बोलला या पलिकडे तिचे विचार जातच नव्हते. तिला हुनसोबतचे क्षण आठवू लागले. एकही क्षण असा नव्हता जिथे हुनने तिची आणि तिच्या सन्मानाची काळजी घेतली नाही. हुनच्या सहवासात तिला सुरक्षितच वाटलं होतं. ती भानावर आली. मिंग पुढे काहीतरी बोलत होती.

“....मोई, हुन तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो गं. त्याचं प्रेम धुडकावणं म्हणजे देवाची पुजा धुडकावण्यासारखं आहे. तो तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाण्याआधीच त्याला थांबव. नाहीतर खूप उशीर होईल.”

मिंगचे हे शब्द ऐकल्यावर मात्र मोईचा संयम सुटला. आपली सॉन्ग तिथेच टाकून ती मागे वळली. धावत धावत पुन्हा नदीच्या दिशेने गेली. तिने जवळ जाऊन पाहिलं तर हुन जिथे बसला होता, ती जागा रिकामी होती. तिने आजूबाजूला पाहिलं. कुठेच हुनची चाहूल नव्हती. मोईच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. तिने न रहावून त्याला जोरात हाक मारली.

“हुनऽऽऽ, कुठे आहेस तू? मी.... मी आलेय. हुनऽऽऽऽ परत ये. खरंच, परत ये. मला माफ कर, मी खूप त्रास दिला तुला.... परत ये हुन.... तुझ्या मोईसाठी, परत ये....” तिला बोलवेना. आपला चेहेरा दोन हातांनी झाकून ती वाळूत बसली. तिला हुंदके अनावर होत होते.

अचानक आपल्या जवळ कुणी तरी येऊन उभं राहिल्याची तिला जाणीव झाली. तिने मान वर करून पाहिलं. तिचा हुन परत आला होता. हुनने तिचे दोन्ही दंड धरून तिला उठवलं, तिचे अश्रू पुसले. काही क्षण ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात एकटक पहात होते. प्रेमाशिवाय तिथे काहीच नव्हतं. हुनचे ओठ बोलण्यासाठी विलग झाले.

विवाह सोहळा संपला आणि सुरू झाली तयारी पहिल्या रात्रीची. आज हुन आणि मोई प्रथमच एका शयनकक्षात एकत्र झोपणार होते. त्यांचा कक्ष सजवता सजवता दासी एकमेकांत चेष्टामस्करी करत होत्या. त्यांच्या हसण्याखिदळण्याने तो कक्ष अगदी गजबजून गेला होता. मिंगदेखील त्यांच्यासोबत आपल्या मैत्रीणीचा शयनकक्ष सजवत होती. तिच्याही कानावर ही चेष्टामस्करी पडत होती.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------