पान ११


“मोई...., मोई, फक्त एकच क्षण थांब. मला माहित आहे, मी तुझा अपराधी आहे. तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे पण मला असं झिडकारून जाऊ नकोस. कमीत कमी माझी बाजू तरी मांडू दे.”

मोई काहीच बोलली नाही. तिच्या चेहे-यावरूनच ती खूप रागात आहे हे समजत होतं.

“मोई, ही गोष्ट अगदी खरी आहे की मी तुला सम्राटांच्या समारंभातच प्रथम पाहिलं होतं आणि ही गोष्ट देखील खरी आहे की पाहताक्षणीच मी तुझ्या प्रेमात पडलो....”
“....मला वेळ नाहीये. काय सांगायचं ते थोडक्यात सांगा.”
“मोई, तू श्रीमंतांचा तिरस्कार करतेस, हे मला आधीच कळलं होतं म्हणून मला तुझ्याशी खोटं बोलावं लागलं.”
“अस्सं! म्हणजे आधीच सर्व माहिती काढून झाली होती तर आणि मी मुर्ख....”
“असं नको म्हणूस मोई. मला आजही तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा आहे. माझ्याबद्दल तुला सर्व खरं खरं सांगून टाकावं असं ब-याचदा वाटलं पण ते ऐकून जर तू मला सोडून गेली असतीस तर.... या भितीने मी तुला ते कधीच सांगितलं नाही.”
“पण शेवटी तेच झालं ना?”
“हो. शेवटी तेच झालं.
“आणि झालं ते चांगलंच झालं!”


“अजिबात नाही. ना त्याने तुला फसवलं, ना मी. अगं मोई, डोळ्यावर कसली एवढी तिरस्काराची पट्टी बांधून घेतली आहेस तू की त्याचं इतकं निर्मळ प्रेम तुला दिसत नाही?”
“हूं! निर्मळ म्हणे. खोट्या माहितीच्या आधारावर रचलेली प्रेमाची पोकळ भिंत होती ती. शेवटी कोसळलीच.”
“खूप झालं मोई आता खूप झालं. अगं ज्या गोष्टीसाठी तू श्रीमंत व्यक्तींचा तिरस्कार करतेस, त्यातील एक गोष्ट तरी तुला हुन मधे दिसली का? अगं तो सरदारपुत्र आहे! त्याला वाटलं असतं तर त्याने हुकुम करून तुला आपल्या प्रासादात बोलावलं असतं. असं मला भेटून तुला भेटण्याची विनंती करण्याची त्याला काहीच गरज नव्हती. त्याला आजही तुझ्या मताचा आदर आहे. म्हणून तर तुझं घर माहित झालं असतानाही तो तुझ्या घरी आला नाही. तुझी बदनामी होऊ दिली नाही. आजही तो तुझ्याशी विवाहाची इच्छा बाळगून आहे.तुझ्यासारख्या छपन्न मिळतील त्याला, पण त्याच्यासारखा प्रियकर तुला क्वचितच मिळेल. एका क्षणासाठी त्याची श्रीमंती त्याच्या स्वभावापासून वेगळी करून पहा, मोई. अगं मन पहा त्याचं, किती निर्मळ आहे. ज्या पुरुषाची कामना करत स्त्रिया रात्र-रात्र जागतात, अगदी तसाच पुरुष तुझ्या आयुष्यात आलेला असताता, तू मात्र त्याला धुडकावते आहेस....”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------