पान १०


दुसर्‍या दिवशी सकाळी पाणी भरण्यासाठी नदीवर आलेल्या मिंगला त्याने गाठलं. मोईच्या बाकीच्या मैत्रीणीही तिच्यासोबत होत्या. आपल्या मैत्रीणीचं गुपित कायम राखण्यासाठी मिंग हुनला एका बाजूला घेऊन गेली.

“सरकार, मोई आपल्याला भेटू इच्छित नाही.” मिंगने खालच्या मानेनेच म्हटलं.

“पण मी तीची भेट घेणं खूपच गरजेच आहे, मिंग.” हुनने अधिरतेने म्हटलं.

मिंगची मान खाडकन वर झाली.

“कशाला भेट घ्यायचीय तिची? पुन्हा तिचं मन दुखवायला? खोटं बोलायला?”

मग आपण कुणासमोर बोलतो आहोत याच तिला भान आलं. तिची मान पुन्हा खाली झाली.

“माफ करा. रागाच्या भरात मी बोलून गेले. पण मोईला आपण न भेटलात तरच उत्तम. आपलं नाव निघालं तरी तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात.” मिंगने दु:खी स्वरात उत्तर दिलं.


“खूप आभारी आहे मी मिंग तुझा. तुझे लाख लाख धन्यवाद.” असं म्हणून हुनने मिंगच्या हातांचं चुंबन घेतलं.

उद्या पुन्हा मोई आपल्याला दिसणार हा विचारसुद्धा हुनच्या चेहे-यावर प्रसन्नता आणण्यास पुरेसा होता. उत्साहाने तो उद्याच्या भेटीत काय काय बोलायचं हे ठरवत आपल्या प्रासादाकडे निघाला.

********

मिंगने दिलेला शब्द पाळला. हुनला त्या मुलींच्या घोळक्यातून मोई चटकन ओळखता आली. तिची काही चूक नसतानाही ती आज आपल्यामुळे मान खाली घालून चालते आहे, हे पाहून अस्वस्थ झालेला हुन पुढे झाला.

“मोई....”

मोई थबकून उभी राहिली पण तिने वळून पाहिलं नाही. तो आवाज तिच्या चांगलाच परिचयाचा होता. तिने फक्त मिंगकडे एक कटाक्ष टाकला. मिंग तिची नजर टाळत हुनकडे पहात होती. मोईच्या इतर मैत्रीणीही हुनकडेच पहात होत्या. मोईने फणका-याने आपली सॉन्ग भरली आणि ती तरातरा काठावर आली. वातावरणातील बदल सर्वांनीच हेरला. मिंगने स्वत:ला सावरत सर्व मैत्रीणींना आपल्याबरोबर चलण्यास खुणावलं. मोई मिंगकडे रागारागाने पहात तशीच उभी होती. मिंग बाकीच्या मैत्रीणींना घेऊन झपझप पुढे निघून गेली. मोईने देखील त्यांच्या दिशेने आपली पावलं उचलली तसा हुनने तिचा हात धरला. मोईने हुनकडे पाहून त्याचा हात झिडकारून आपला हात सोडवून घेतला.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------