पान १


सम्राट शिंग ने आपल्या वाढदिवसाप्रित्यर्थ ठेवलेल्या समारंभात, समारोपाच्या नृत्यामधे प्रमुख नर्तिका म्हणून मोई ने अप्रतिम नृत्य सादर केलं. तिच्या नृत्यनिपुणतेने सर्वच उपस्थित दिपून गेले. सम्राट शिंग ने तर खुश होऊन आपल्या हातातील सोन्याची अंगठी मोईला बक्षीस म्हणून दिली. पण सरदारपुत्र हुन मात्र मोईला पाहताक्षणी आपलं हृदयच हरवून बसला होता."अच्छा! म्हणजे प्रकरण गंभीर आहे तर?" हुनकडे मिस्किल नजरेने पहात योह म्हणाला. "बोल मित्रा, आज पहिल्यांदाच तुझ्या चेहे-यावर एक वेगळीच चमक दिसते आहे मला. माझा मित्र चक्क प्रेमात पडला आहे. तुला हवी असलेली सर्व मदत करायला मी तयार आहे."

"खरंच मित्रा, खरंच मदत करशील मला?"

"आपल्या मैत्रीची शपथ घेऊन सांगतो, हुन. तुझं आणि मोईचं मिलन घडवून आणण्यासाठी मी तुला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे."

"मित्रा, तू मला मदत करणार म्हटल्यावर तर मला उत्साह आलाय पण त्यापूर्वी मला एका गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे." हुन योहला म्हणला.

"आता आणखी काय?" योहने विचारलं.

"आपण इथे मारे माझ्या नि मोईच्या मिलनाचे बेत आखतो आहोत पण मोईच्या मनात काय आहे, हे मला कुठे माहित आहे? न जाणो तिचं दुस-या कुणावर प्रेम असलं तर?" हुन उदास स्वरात म्हणाला.

"मग काय झालं? अरे, एक सरदारपुत्र तिला मागणी घालतोय म्हटल्यावर, कुठल्याही सामान्य तरूणाच्या प्रेमापेक्षा, ही मागणी तिला लाख मोलाची वाटेल." राजपुत्र योह बेफिकीरपणे म्हणाला.

"नाही मित्रा, हे चुकीचं आहे. हा तर सरळसरळ अन्याय आहे त्या तरूणाच्या प्रेमावर. शिवाय मोई ने जर मी सरदारपुत्र आहे म्हणून तिच्या प्रियकराचं प्रेम धुडकावलं, तर ती माझ्याशी किती बरं एकनिष्ठ राहू शकेल? हा माझ्यावर आणि तिच्यावरही अन्यायच नाही का?"

"तू तर मलाच द्विधा मन:स्थितीत टाकलंस, हुन. आता या समस्येवर काय उपाय आहे, हे मला माहित नाही." आपले दोन्ही हात कमरेवर ठेवत राजपुत्र योह म्हणाला.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------