पान ३२


राजेशने केसपेपर्स ताब्यात घेतले आणि रितूचा हात धरून अरविंदकाकांना ’चला’ म्हणून खूण केली. ते तिघे बाहेर आले, तेव्हा गाडीच्या दरवाज्याजवळ साहिल अपराध्यासारखा मान खाली घालून उभा होता. जयरामकाका त्याच्याशी बोलत होते.

“….तुझ्या मित्राची गरज मला नव्हतीच. त्याला फक्त इतकंच सांगायचं होतं की पत्त्याचा डाव जसा अर्धवट टाकून उठता येतं, तसं हे नसतं. हा खेळ नाही, साहिल.”

“काका, देवाशपथ सांगतो. मी पुन्हा कधीच हे करणार नाही.”

“गुड,” जयरामकाका त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले. “हे तुझ्या मित्रालाही समजावून सांग आणि आता आम्ही परत येईपर्यंत अभ्यासात लक्ष घाल.”

साहिलने खाली मान घालूनच ’हो’ म्हटलं आणि तो आपल्या बाईकवरून निघून गेला.

जयरामकाका गाडीत बसले आणि राजेशने राहूलला फोन केला.

“हां, राहूल…. हो, चाललोय… नाही, नको देऊस…. मग मनूसुद्धा येईल फोनवर…. नाही, त्याची खरंच काही गरज नव्हती. तुम्हाला इथे येऊ नका सांगितलं त्याला कारण आहे…. सांगेन… हे बघ, आता जास्त बोलत नाही. पल्लवीला नंतर माझा फोन येऊन गेला एवढा निरोप दे… चल, ठेवतो..”

राजेशचा फोन झाला आणि जयरामकाकानी किंचीत मान तिरकी करून मागे बसलेल्या राजेशशी बोलायला सुरूवात केली.

“पाहिलंस ना, राजेश. आपले आजोबा खंगून खंगून मेले, हे सांगताना कशी अवस्था झाली होती, त्या कैलास पाटलाची? सुभानराव मरताना का होईना, खरं बोलला म्हणून कैलासला सर्व माहित झालं होतं. म्हणूनच त्याने घाईघाईने हे घर विकण्याचा बेत आखला. हेच मला माहित करून घ्यायचं होतं.”


राजेश आणि अरविंदकाकांनी मान डोलावून जयरामकाकांना होकार भरला. जयरामकाकांनी हेलनला सूचना केल्या.

“हेलन, ज्या क्षणी मी तुला ’ये’ म्हणेन, त्याक्षणी तुला रितूचं शरीर सोडावं लागेल. जर तू तसं केलं नाहीस, तर तुला पुढचं काहीच कळणार नाही. तू आता मुक्त आहेस, त्यामुळे एकदा का तुझी उद्देशपूर्ती झाली की तुला या जागेतून कायमचं निघून जावं लागेल. जर दिलेलं वचन मोडलंस, तर तुला कुठल्याही मनुष्याचा माध्यम म्हणून वापर करता येणार नाहीच पण तू ह्या खोलीतूनही कधीह बाहेर पडू शकणार नाहीस.”

“मला मंजूर आहे. माझा उद्देश संपला की मी निघून जाईन.” हेलन म्हणाली.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------