पान ३१


इतक्या वेळात पहिल्यांदाच जयरामकाकांनी हेलनला प्रश्न विचारला.

“हेलन, जर तुला एकदा सुभानरावापर्यंत पोहोचता आलं होतं, तर दुसर्‍या वेळेस तू रितूला माध्यम का बनवलंस?”


“हे बघ, हेलन. तुझ्याबाबतीत जे झालं, ते खूप वाईट आहे. तुझा राग संपूर्णपणे समर्थनीय आहे पण तुला माहित आहे का? तुझ्या उद्देशपूर्तीसाठी तू ज्या स्त्रीला माध्यम बनवलंयस तिची काय अवस्था झाली आहे?”

मला फक्त एकदा त्या नराधमापर्यंत पोहोचू दे. मी रितूला स्वत:हून सोडून देईन. तिच्याशी माझं काहीच शत्रुत्व नाही.

जयरामकाकांना तिला कसं समजावून सांगावं, हे समजत नव्हतं.

“हेलन, ह्या सूडाच्या विचारापायी तू किती वर्षं वाट पाहिली आहेस, हे माहिती आहे का तुला?”

मी कितीही वर्षं वाट पहायला तयार आहे.

“पण तोपर्यंत ती व्यक्तीसुद्धा जिवंत असायला हवी ना?”

म्हणजे...?

“म्हणजे... म्हणजे हेलन, तुला वाटतं तसा फक्त आठ-दहा वर्षांचा काळ उलटलेला नाहीये. त्या प्रसंगाला आता किमान साठ-पासष्ट वर्षं होऊन गेली आहेत..”

काय?” हेलनच्या तोंडून अपेक्षाभंगाने उद्गार निघाला.

“हो हेलन. आबाजीच आता ब्याण्णव वर्षांचा आहे आणि सुभानराव….”

सुभानराव...?” हेलनच्या डोळ्यात पुन्हा ठिणगी फुलताना दिसली.

“सुभानराव हे जग सोडून गेल्याला किमान तीस वर्ष झाली आहेत.” शेवटचं वाक्य उच्चारताना जयरामकाकांनाही तिच्याकडे पहाणं जड गेलं.

नाहीऽऽ, नाहीऽऽ... तो माझ्याच हातून मरायला हवा होता... मला मारून टाकायचं होतं त्याला... तिथेच...त्याच जागी...” हेलनचा चेहेरा पुन्हा विद्रुप झाला. ह्या बातमीने ती चवताळली होती.

हेलनची ही प्रतिक्रिया जयरामकाकांना अपेक्षित अशीच होती. ती रागाने मुठी वळवत होती. जयरामकाकांनी जाऊन तिचे दोन्ही हात धरले.

“हेलन... हेलन... इकडे बघ... इकडे बघ, हेलन...” जयरामकाकांनी तिचा चेहेरा आपल्याकडे वळवला.

“तुला सूड घ्यायचा आहे ना?... सूड घ्यायचा आहे ना?”

हेलनने मानेने ’हो’ म्हटलं.

“तर मग त्यासाठी मी प्रयत्न करतो. तू आधी शांत हो. शांत हो.”

आणि खरंच हेलन पहिल्यासारखी शांत झाली. राजेश आश्चर्य आणि भितीने जयरामकाकांकडे पहात होता. जयरामकाकांनी त्याला हसून उत्तर दिलं.

“तुझा अंदाज खरा आहे, राजेश. मी तोच प्रयत्न करून पहाणार आहे. मला फक्त कैलास पाटीलशी एकदा बोलायचंय. अरविंदकाका त्याच्याच घरी गेलेत. तुमच्या घराच्या करारपत्रावरील त्याचा पत्ता खरा होता.”

“काका, एकाच्या चुकीसाठी दुसर्‍याला शिक्षा देणार तुम्ही?”

“अजिबात नाही. आणि शिक्षा करणारा मी कोण? सुभानराव पाटील माझा अपराधी नाही, तो हेलनचा अपराधी आहे.”

“पण काका...”

“राजेश, काही गोष्टी आपल्या त्रिमितीपलिकडच्या असतात. मी हे मान्य करतो कारण मी स्वत: तशा प्रसंगातून गेलोय. त्या प्रसंगानेच मला पॅरानॉर्मल केसेसचा अभ्यास करायला प्रवृत्त केलं. हेलनच्या केसमधे मला फक्त एक गोष्ट खात्रिलायकरीत्या माहित करून घ्यायचीय, म्हणून मी अरविंदची वाट बघतोय.”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------