पान २९


रॉबर्टने तिला कवेत घेतलं. तिच्या ओठांना स्पर्श करण्यासाठी तो पुढे झाला, तेवढ्यात वरच्या बाजूने आबाजीने मोठ्याने मारलेली हाक त्याने ऐकली.

“स्सायेऽऽब, लवकर या हिकडंऽऽ….““नाहीऽऽ!“

बंदूकीच्या आवाजापाठोपाठ हेलनची किंकाळी घुमली. एकट्या सुभानरावाचं लक्ष गेलं तिच्याकडे. तरूणांच्या गराड्यातून वाट काढत सुभानराव हेलनच्या दिशेने धावला. हेलन पुन्हा तळघराच्या दिशेने पळाली. सुभानरावाला वाटलं होतं, तसं हेलनला मिळवणं इतकं सोपं नव्हतं. इतका वेळ ह्या तमाशाने गोंधळून गेलेल्या आबाजीने सुभानरावाच्या अंगावर झेप घेतली.

“न्हाई मालक. आपल्या अब्रूत आन् परक्याच्या अब्रूत फरक करू नका.” त्याने सुभानरावाला विनवलं.

“अरे हट! ह्ये जाऊन त्या विलायती सायबाला सांग,” असं म्हणून सुभानरावाने आबाजीच्या छातीत लाथ मारली.

आबाजी तिथेच खाली पडला. सुभानरावाने तळघर गाठलं. हेलनने चपळाईने तळघरतील दार आतून बंद करून घेतलं होतं. सुभानराव दारावर थडाथड लाथा मारत होता. आबाजी पुन्हा जोर करून उठला. धडपडत तळघरात गेला. रॉबर्टला गोळी घालून झाल्यावर त्याच्या मृतदेहाला लाथाबुक्क्यांनी तुडवून त्या तरूणांचा घोळकाही तळघराच्या दिशेने धावला. सुभानरावाचं दारावर लाथा मारणं सुरूच होतं. आपले साथिदार आलेले पाहून सुभानरावाने त्यांनाही दारावर लाथा मारायला लावल्या.

“मालक, असं नगा करू. परक्याच्या आयाभनीबी आपल्या आयभनीवानी असत्यात.” आबाजीने सुभानरावाचे पाय धरले.

“लई वटवट करतोय हा. ए, ह्याचं हात पाय बांधा रं आन् तोंडबी बंद करा.”

दोन तरूणांनी मिळून आबाजीचे हात पाय बांधले आणि त्याच्या तोंडात बोळा कोंबला. आबाजी विस्फारलेल्या डोळ्यांनी पहात होता. लाथांच्या आघातांनी तळघराचं दार उघडलं होतं. सुभानरावाने त्या खोलीत सगळीकडे नजर फिरवली. हेलन कुठेच दिसत नव्हती. ह्या खोलीला दुसरं दार, खिडकी, झरोका काही नसताना हेलन गेली कुठे हे त्याला समजत नव्हतं. अचानक त्याची नजर पलंगाजवळच्या मोठ्या पेटीवर गेली. तो स्वत:शीच हसला. शांतपणे एक एक पाऊल टाकत, सुभानराव त्या पेटीच्या जवळ गेला. त्याने हळूच पेटीचं झाकण वर उचललं आणि आत लपलेल्या हेलनच्या केसांना धरून तिला बाहेर काढलं. हेलन त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी झटापट करत होती. आबाजीची हातपाय सोडवण्याची धडपड निष्फळ ठरत होती पण त्याही अवस्थेत तो तोंडातल्या तोंडात आवाज काढून सुभानरावाला विरोध दर्शवत होता….


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------