पान २८


समारंभाचे यजमान सर जेम्स टॉमस आणि त्यांची पत्नी व्हिक्टोरियाशी ओळख झाल्यावर तर हेलनला या समारंभाला आल्याचा खूप आनंद झाला. रॉबर्टचं नवीनच लग्न झालं आहे, हे ध्यानात घेऊन त्यांनी त्यांच्या मर्जीतील एका भारतीय जमिनदाराकडे त्याचं जुनं घर काही दिवसांकरिता मागून घेतलं. जमिनदार सर्जेराव पाटलांनी ते मोठ्या आनंदाने दिलं. गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या कुशीत वसलेलं शे-दीडशे वस्तीचं एक छोटंसं गाव. इंग्रजांच्या राजवटीचा या गावाला ना कधी तोटा झाला, ना कधी फायदा. इथले लोक आपल्याच मस्तीत रहायचे. काबाडकष्ट करून जे काही थोडंफार पिकवायचे, त्यात ते समाधानी होते. म्हणूनच की काय, या गावाला आनंदगाव असं नाव पडलं होतं. अशा ह्या सुंदर गावी रॉबर्ट आणि हेललने आपल्या मधुचंद्रासाठी जावं, असं सर जेम्स टॉमस यांनी सुचवलं. आपले वरिष्ठ स्वत:हून आपल्याला पंधरा दिवसांची सुटी देतायंत तर रॉबर्टही कशाला नाही म्हणेल. तो नोकरीतले सगळे मनस्ताप विसरला. आता त्याला फक्त एकच दिसत होतं. तो, हेलन आणि आनंदगावातील मधुचंद्र!

संशयिताला तुरूंगात डांबत होते. रॉबर्ट आणि हेलनच्या मधुचंद्राचा तिसरा दिवस होता तो. रॉबर्टने हेलनला पुन्हा तोच पारंपारिक पोशाख घालण्याचा आग्रह केला. सर जेम्सच्या समारंभाला जाण्यापूर्वी, त्या पोशाखात झालेलं हेलनचं मोहक दर्शन तो विसरू शकत नव्हता. हेलन तो पोशाख घालून बाहेर आली. रॉबर्टने तिला आपल्या मिठीत घेतलं.

“आज तुला एक गंमत दाखवतो इथली.” रॉबर्टने तिच्या नाकावर आपलं बोट हलकेच आपटत म्हटलं. तिचा हात धरून त्याने तिला दिवाणखान्यात आणलं. दिवाणखान्याच्या एका कोप-यात एक जिना खालच्या बाजूने गेलेला दिसत होता. रॉबर्टने हेलनला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि तो एक एक करत जिन्याची पायरी उतरू लागला. हेलनला ही जागा नवीनच होती. गेल्या दोन दिवसात तिचं रॉबर्ट सोडून इतर कुठेच लक्ष गेलं नव्हतं, त्यामुळे आश्चर्ययचकित होत, ती ते तळघर पहात होती. जवळजवळ दिवाणखान्याच्याच लांबीरुंदीएवढं तळघर होतं ते.

तिला तसंच हातावर ठेवून रॉबर्टने तळघराला असलेला एकमेव दरवाजा आपल्या पायाने आत ढकलला. आत एक सुंदर पलंग होता. त्याच्या बाजूला एक भली मोठी पेटी आणि आरामखुर्ची. हेलनला ते सर्व फार फार आवडलं. त्याच्या गळ्यात घातलेले आपले हात सोडवून ती जमिनीवर उभी राहिली.

“ओह रॉबर्ट, इट्स ब्युटिफुल!” ती अत्यानंदाने उद्घारली.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------