पान २६


जयरामकाकांनी संपूर्ण तळघरावरून नजर फिरवत होते. अचानक एका ठिकाणी ते थांबले. त्यांनी साहिलला विचारलं, “साहिल, प्लॅन्चेट करायला इथेच बसला होतात ना?”

साहिल डोळे विस्फारून जयरामकाकांकडे पहात होता. काकांबद्दल त्याने बरंच ऐकलं होतं पण आज त्याला प्रत्यक्ष अनुभवच आला.

“हो काका, इथेच बसलो होतो आणि....”

त्याला हाताने अडवत जयरामकाका खाली उकीडवे बसले आणि त्यांनी जमिनीला स्पर्श केला. अरविंदकाका आणि राजेश तर काही न बोलता, जयरामकाका काय करतायंत, ते पहात होते. चार माणसं त्या तळघरात असूनही तिथे टाचणी पडली तर आवाज येईल इतकी शांतता होती. अचानक जयरामका उठले आणि त्यांनी सर्वांना सांगितलं, “चला, माझं इथलं काम आत्तापुरतं संपलंय. आता थेट मुंबई.”राजेशने पटकन जयरामकाकांकडे पाहिलं. त्यांनी राजेशला डोळ्यांनीच ’तिच्याजवळ जा’ अशी खूण केली. जयरामकाकांनी अशा वेळी काय करायचं हे सांगून ठेवलेलं असलं, तरी ते प्रत्यक्षात आणताना राजेशच्याही उरात धडकी भरली होती. तो घाबरत घाबरतच तिच्या जवळ जाऊन बसला. यावेळेस तिच्या हातांना बांधलेला बेल्ट सोडवण्याचा वेडेपणा न करता, त्याने नुसतात तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याने तिला हाक मारली.

“हेलन....”

जादू झाल्यासारखी तिच्या तोंडून पाहेर पडणारी शिवीगाळ खाडकन थांबली. तिच्या नजरेतील धग हळूहळू कमी झाली. राजेशने तिला पुन्हा हाक मारली.

“हेलन, इकडे.... माझ्याकडे बघ.”

तिने हळूहळू मान वळवून राजेशकडे पाहिलं. राजेश तिच्या चेहेर्‍याकडे पहात होता. तिच्या चेहेर्‍यावरचे क्षणापूर्वीचे रानटी भाव जाऊन, त्याजागी एक निरागस चेहेरा दिसत होता. हा चेहेरा रितूचा असूनही रितूचा नाही, हे कळण्याइतपत वेगळेपण त्या चेर्‍यामधे होतं. तिच्या सुकलेल्या ओठांवर एक हलकसं स्मित उमटलं.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------