पान २५


“कुणाला बोलवायचं असं काही आमचं ठरलं नव्हतं. अमितला त्याच्या एका मित्राकडे पडून असलेला प्लॅन्चेट बोर्ड मिळाला. त्या मित्राने आत्म्याला कसं बोलवायचं त्याची प्रोजीसर सांगितली आणि म्हणाला, “कुणालाही बोलवा”, म्हणून आम्ही जस्ट....” अरविंदकाकांच्या चेहे-यावरचे भाव पाहून साहिलने वाक्य अर्धवट सोडून दिलं.

“म्हणजे.... तू मला अर्धवट खरं सांगितलंस साहिल, हो ना?” अरविंदकाका डोळे वटारत म्हणाले.

“एक मिनिट, एक मिनिट.” जयरामकाका अरविंदकाकांना अडवत म्हणाले. “हे बघ, तू ह्याला ओरडल्याने प्राप्त परिस्थितीत काहीही फरक पडणार नाहीये. त्यापेक्षा आपण उपाय शोधू या.

अरविंदकाकांनी साहिलवरुन नजर वळवून घेतली आणि जयरामकाकांना म्हणाले, “जया, तुझ्याकडून काही होऊ शकतं का रे?”

“मी आत्ताच कुणालाही वचन देत नाही.” जयरामकाकांनी अरविंदकाका आणि राजेशकडे पहात म्हटलं, “पण मी या प्रकरणात लक्ष जरूर घालणार आणि माझी संपूर्ण ताकद पणाला लावणार, या प्रकरणाची पाळं मुळं खणण्यासाठी....”

त्यांच्या तेवढ्या बोलांनीही राजेशला खूप धीर आला. त्याने पुढे होऊन जयरामकाकांचे पाय धरले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.अरविंदकाका आणि राजेश आ वासून त्यांचं बोलणं ऐकत होते. जयरामकाकांच्या ते लक्षात आलं तसं ते मनापासून हसले.

“तुम्हाला वाटत असेल, काय बडबड करतोय हा. चला, ही बडबड इथेच संपवतो. आता आपण पुढे काय करायचं, ते ठरवूया. राजेश, आता सर्वात आधी तू रितूला भेटायचंस. ती खूप आक्रमक झालेली असेल, गोंधळलेली असेल पण कुठल्याही परिस्थितीत तू तिच्या म्हणजे.... तुला समजलं ना.... ’तिच्या’ विरोधात आहेस, असं तिला जाणवू देऊ नकोस.” राजेशने मान डोलावली.

जयरामकाका अरविंदकाकांकडे वळून म्हणाले, “अरविंदा, तू ह्या घराचा जुना मालक कैलास पाटील कुठे रहातो, त्याचा ठावठिकाणा काय, याचा शोध घ्यायचास. काहीही कारण सांग, खोटं बोल पण त्याचा पत्ता काढून घे आणि त्याला भेट. त्याला काय सांगायचं, हे मी तुला वेळ आल्यावर सांगेन. आपण तिघेही, मिळेल त्या गाडीने, मिळेल त्या वाहनाने मुंबईला जाणार आहोत. राजेश, मी तुझ्यासोबत हॉस्पिटलला येणार आहे....”

“काका, मी काही मदत करू का?” अचानक साहिलचा आवाज आला. तो नुकताच जेवून बाहेर आला होता. जयरामकाका काहीतरी उपाय शोधतायंत म्हटल्यावर त्यालाही मदत करण्याची संधी हवी होती.

“साहिल, तुला रितूवहिनी पहिल्यासारखी चांगली व्हायला हवी असेल, तर एकच करायचं. तुझ्या त्या मित्राला सांगायचं की पुन्हा प्लॅन्चेट करायचं आहे. त्याच जागी! तो ’नाही’ म्हणाला तर तसं मला कळवायचं.”

साहिलने ’हो’ म्हणत मान डोलावली.

“इथून मुंबईला जाण्याआधी मला ते घर पहायचं आहे.” जयरामकाका म्हणाले.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------