पान २४


म्हातार्‍याचं बोलून संपलं, त्याला बराच वेळ होऊन गेला, तरी अरविंदकाका आणि राजेश सुन्न बसून होते.

म्हातार्‍याने पुन्हा बोलायला सुरूवात केली आणि ते दोघेही दचकले.

“त्या दिशी सुभान्याला शेवटचं पाह्यलं म्या. त्या दिवसापासून ते आजपातूर त्या घरात पाटलाच्या घरचं कुनी बी –हात न्हाय. तुला घर इकताना काय मोहिनी घातली, त्यानं त्यालाच ठावं.”

राजेशने म्हातार्‍याला यावर काहीच उत्तर दिलं नाही. त्याने अरविंदकाकांकडे पाहिलं.

“काका, काय करायचं?”

“काय करायचं म्हणजे? हा गुन्हा आहे. अपराध्याला शिक्षा ही व्हायलाच हवी.”

“पण अपराधी शोधायचा कसा काका?”

या प्रश्नाचं उत्तर अरविंदकाकांनाही माहित नव्हतं. अचानक काहीतरी सुचल्यासारखं ते उठले.

“चल, राजेश.”

राजेश उठून कपडे झटकेपर्यंत अरविंदकाका झपझप चालायला लागले होते. त्यांना गाठावं की म्हाता-याचा निरोप घ्यावा हेही राजेशला कळत नव्हतं इतका तो अरविंदकाकांच्या कृतीने गोंधळून गेला. तो खाली वाकून म्हाता-याला “येतो” म्हणाला. तेवढ्यात म्हाता-याने त्याचा हात गपकन पकडला.

“पोरा, इतकी वर्सं ह्ये गुपित माझ्या काळजात दडवून ठिवलं हुतं. माज्या नातवला बी ठावं न्हाय त्ये. तुजी बायको मला भेटाया आली नसती, तर माझ्यासंगच ह्ये गुपित बी संपलं आसतं. आता येकच सांगतो. त्या घराचा नाद सोड.... त्या घराचा नाद सोड.”

राजेशने मान डोलावली आणि तो अरविंदकाकांना गाठण्यासाठी निघाला. दोघे घरी पोहोचले तेव्हा दुपार होत आली होती. म्हाता-याची हकिकत ऐकताना वेळ कसा गेला, हे दोघांनाही समजलं नव्हतं. घराजवळ येताच बाहेर उभी असलेली गाडी पाहून अरविंदराव धावतच घरात शिरले.

जयरामकाका सोफ्यावर बसले होते. साहिल त्यांच्या समोर उभा होता आणि जयरामकाका त्याला प्रश्न विचारत होते.

“कुणाला बोलवलं होतंत तुम्ही?”

साहिलने या प्रश्नाचं उत्तर देण्याआधीच अरविंदकाकांनी जयरामकाकांना हाक मारली. दोघं एकमेकांकडे पाहून हसले आणि एकमेकांना कडकडून भेटले.

“अजून तस्साच आहेस.” जयरामकाकांकडे पहात अरविंदकाका म्हणाले.

“तू तरी कुठे बदलला आहेस? काम नसलं की नवीन काम शोधून काढण्याचा तुझा स्वभाव कुठे बदलला आहे.”

“अरे दोन वर्षांत काय स्वभाव बदलतो का?” असं म्हणत हसत हसत अरविंदकाकांनी जयरामकाका आणि राजेशला बसण्याची खूण केली. राजेशची ओळख करून दिल्यानंतर अरविंदकाकांनी राजेशला जयरामकाकांची ओळख करून दिली.

“राजेश, हे जयराम महाबळ. माझे वर्गमित्र आहेत. शाळेपासूनच आमची मैत्री आहे.” मग

राजेशने नकारार्थी मान हलवली. काकांनी बोलणं पुढे सुरू केलं.

“याचं कारण, त्या मनुष्याची सद्संद्‍विवेकबुद्धी त्याला दारूच्या गुत्त्यावर जाण्यापासून रोखत असते. म्हणजेच या जगात जशा चांगल्या शक्ती आहेत, तशाच वाईट शक्तीही आहेत. घरी खाऊन-पिऊन तृप्त असणारी माणसं काहीही कारण नसताना, चोरी करतात. त्याला शास्त्रीय भाषेत क्लेप्टोमेनिया असं म्हणतात. पण ही वाईट शक्तिच ना!”

राजेशला काकांचं म्हणणं पटलं होतं. अरविंदकाका आणि साहिलही लक्ष देऊन ऐकत होते.

“जया, आता तर मला खात्रीच पटलीय की आम्हाला तूच मदत करू शकशील. या आमच्या लेकाने....”

जयरामकाका अरविंदकाकांच बोलणं तोडत मधेच म्हणाले, “अरविंदा, साहिलकडून मला जे काही कळलंय, त्याचा राजेशच्या पत्नीच्या बदललेल्या वागण्याशी खूप जवळचा संबंध आहे. अरे हो! साहिल, मगाशी ते राहूनच गेलं..... कुणाला बोलवलं होतंत तुम्ही?”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------