पान २३


दारात उभ्या असलेल्या त्या माणसाला पाहून साहिलच्या चेहे-यावर ओळखीच्या खुणा उमटल्या.

“जयरामकाका!” साहिल अत्यानंदाने ओरडत धावत त्यांच्याजवळ गेला आणि पाया पडला.

“कसा आहेस बेटा?” जयरामकाका त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले.

“बरा आहे. काका.... आत या ना!”

जयरामकाका आत येऊन बसले. साहिलने त्यांना पाणी आणून दिलं.

“तुझे बाबा कुठायंत?” जयरामकाकांनी इकडे तिकडे पहात म्हटलं.

“ते एका कामासाठी गावातच गेलेत.”

“छान!” जयरामकाका हसत म्हणाले. “म्हणजे, सुटी घेऊन इथे आलाय पण गप्प बसवत नाहीये त्याला. काही ना काही काम हवंच.”

साहिल प्रतिसादादाखल नुसतंच हसला.

“आणि तुझं काय? तुला करमतं का इथे गावी?”

“अं.... नाही..... तसं करमत नाहीच पण माझे मित्र सुद्धा आपापल्या गावी गेलेत, म्हणून म्हटलं यावर्षी बाबा जाणारच आहेत तर आपणही जावं. राहूलदादासुद्धा आला होता पण त्याला काम आलं म्हणून तो निघून गेला.”

“हो का? अरे वा, मस्तच की. बरं आहे, तुम्हाला गावं पहायला मिळालं ते. तुम्हा आजकालच्या पोरांना गाव म्हणजे काय, ते ठाऊकच नसतं....”

“पण काका, तुम्ही कुठे होतात इतके दिवस? आमच्या घरी तुम्ही शेवटचं आलात, त्यालाही दोन वर्ष झाली असतील....”

हे ऐकल्यावर जयरामकाका किंचित गंभीर झाले पण चेहे-यावरचं हास्य कायम ठेवत त्यांनी साहिलला उत्तर दिलं.

“काम थोडं जास्तच लांबलं माझं, नाहीतर राजेशच्या साखरपुड्याला येऊ शकलो असतो. गेल्या आठवड्यात मी मुंबईत आलो. आल्या आल्या तुमच्याच घरी फोन लावला, तेव्हा कळलं की तुम्ही इकडे आला आहात. मुंबईतील एक दोन कामं उरकली नि तुम्हाला भेटायला निघून आलो....”

बोलता बोलता जयरामकाकांच्या लक्षात आलं की साहिलचं काहीतरी बिनसलं आहे. त्याचं बोलण्याकडे लक्षच नाहिये.

“साहिल, बेटा खूपच बोअर झालेला दिसतोस तू इथे?”

“नाही हो काका.”


साहिलने चाचरत उत्तर दिलं, “अनुभव म्हणजे... खरं सांगायचं तर.... आम्हालाच समजलं नव्हतं की ते आपोआप झालं की आमच्या बोटांच्या वजनामुळे.”

“....म्हणजे बोर्डवरचा इंडिकेटर हलला होता पण तुम्ही लक्ष दिलं नाहीत.”

साहिलला जयरामकाकांच्या नजरेला नजर देणं जड जात होतं.

“हो, तसंच काहीतरी.... आम्ही तीन-चार वेळा प्रयत्न केला पण काहीच होत नव्हतं, म्हणून आम्ही मनूलासुद्धा त्यात सामिल करून घेतलं.... नंतर इंडीकेटर हलायला लागला. ते बघून मनु जोरजोरात हसत होता. त्यामुळे आम्हाला वाटलं मनूच मुद्दाम इंडीकेटर इकडे तिकडे फिरवतोय. म्हणून आम्ही प्लॅन्चेटचा नादच सोडून दिला आणि सगळं आवरतं घेतलं.”

जयरामकाका काही न बोलता साहिलकडे पहात स्तब्ध बसून होते.

“काका....काय झालं?”

“कुणाला बोलवलं होतंत तुम्ही?” जयरामकाकांनी प्रश्न केला.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------