पान २२


“बाबा, मी खरंच सांगतोय हो! आम्ही दोघांनी प्लॅन्चेट केलं, तेव्हा रितू वहिनी तिथे नव्हतीच. तिला माहित झालं असतं, तर तिने दुस-या दिवशी तरी मला विचारलं असतं.”

अरविंदकाका अजूनही रागातच होते.

“बाबा.... आय अॅम सॉरी....” साहिलने पुन्हा माफी मागीतली.

“सॉरी माय फूट!” अरविंदकाका वैतागलेल्या स्वरात ओरडले आणि आत निघून गेले.

साहिल आपलं डोकं धरून बसला होता. त्याच्या डोक्यावरून हलकेच कुणाचा तरी हात फिरला, तसं त्याने मान वर करून पाहिलं. तो राजेश होता. रात्री त्याला नीट झोप लागली नव्हती, हे त्याच्या डोळ्यांवरूनच दिसत होतं.

“साहिल, मला माहितीय तुला मनापासून पश्चात्ताप होतोय. काही वेळाने काकांचा राग होईल शांत. तुझ्या हातून नेहमी चांगलं काहीतरी घडावं, या उद्देशानेच ओरडले ते तुला.”

साहिलने होकारार्थी मान हलवली.

“साहिल, मला आत्ता महादूच्या घरी जायचंय. जरा बाबांना बाहेर बोलावून आणतोस का?”

“हो. दादा, मी पण येऊ?”

“नको साहिल. तू इथेच घरी थांब. थोडं मोठ्या माणसांचं काम आहे.”

साहिलने मान डोलावली आणि तो अरविंदकाकांना बोलवायला आत निघून गेला.“आसं व्हय. अवो मंग नेतू की माज्या आजाकडं.”

“म्हणजे घरात नाहीत ते?”

“घरातच हाय, पन मागल्या दाराला झाडाच्या सावलीत हवा खात बसलाय. मी घोंगडी हातरून देतो तिथं. तुमी बसा निवांत.”

बोलता बोलता महादू त्या दोघांना घराच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. एक जराजर्जर म्हातारा एका आंब्याच्या झाडाखाली घोंगडीवर बसला होता. वयाच्या मानाने नजर बरी असावी त्याची. आपल्या दिशेने समोरून कुणीतरी चालत येतंय, हे दिसल्यावर तो सावरून बसला.

“ए आज्या, तुला भेटाया पावनं आलंत बग.” महादूने आजाच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं.

“कोन ते?”

“काका, नमस्कार. मी अरविंद थोरात....”

“थोरात म्हंजी तू रामचंद्राचा पोरगा?” म्हाता-याने डोळे बारीक करून विचारलं.

अरविंदकाकांनी त्याच्याकडे विस्मयाने पहात ’हो’ म्हटलं. इतका वयोवृद्ध माणसाची स्मरणशक्ती शाबूत असेल, असं त्यांना वाटलं नव्हतं.

“.... आणि हा राजेश....” अरविंदकाकांनी राजेशची ओळख करून दिली.

म्हाता-याने समजल्यासारखी मान डोलावली आणि हसत राजेशला म्हणाला, “ती रितिका तुजी बायको हाय न्हवं?”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------