पान २१


“पल्लवी, ठिक आहेस ना?” राहूलने विचारलं. त्याच्या नुसत्या स्पर्शानेही पल्लवी केवढीतरी दचकली.

“राहूल....” पल्लवी त्याला घट्ट बिलगली. राहूल काही न बोलता तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला.

काही वेळापूर्वीच्या त्या प्रसंगाने पल्लवीची मानसिक स्थिती ढासळली होती. तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती, असा प्रसंग तिच्या आयुष्यात घडला होता. जर वेळेवर हॉस्पिटलची लोकं आली नसती, तर पल्लवी आणि मनू, दोघंही आपला जीव गमावून बसले असते. नशीब! मनू जागा होऊन बाहेर आला, तेव्हा हॉस्पिटलच्या लोकांनी रितूला बाहेर नेलं होतं.

“राहूल.... हे.... हे काय झालं रे वहिनीला?” पल्लवी हमसाहमशी रडू लागली.“आपण दोघं मिळून एकदा राजेशशी बोलू या का?”

“आता त्याची गरज नाही, राहूल. बहुतेक दादालासुद्धा असा अनुभव आला असावा, म्हणून तर तो इतक्या तातडीने आनंदगावला रवाना झाला.”

“अच्छा! पण मग तू मला राजेश कामासाठी गेलाय म्हणून का सांगितलंस?”

“अरे, मग काय सांगू? मलाच नीट काही कळलं नव्हतं. दादाने जे सुचवलं तेच कारण मी तुला दिलं.”

“मनू ठीक आहे ना?”

“हो. त्याने काहीच बघितलं नव्हतं.”

“तू राजेशला फोन लावला होतास?”

“खूप प्रयत्न केले. नेटवर्क मिळत नाहिये.”

“तू झोप शांतपणे, मी ट्राय करून पहातो.”

“नाही राहूल. ही शांत झोपायची वेळ नाही. अरे, मला काही झालं नाहीये. मला वहिनीची काळजी वाटतेय….”

“पल्लवी, आता तू जास्त विचार करू नकोस. शांत पडून रहा. बघ, मनूसुद्धा शांत झोपलाय नं?”

“राहूल, प्लीज इथून जाऊ नकोस हं. मला खूप भिती वाटतेय.”

“नाही जाणार. इथेच तुमच्या दोघांच्या उशाशी बसून राहीन मी. आता तरी झोपशील ना?”

उत्तरादाखल पल्लवी पुन्हा कॉटवर आडवी झाली. राहूल तिच्या खांद्यावर थोपटत राहिला.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------