पान १८


“तू आधी तिला चुकीचं ठरवलंस, आता वेडं ठरवून मोकळा झालास?” पल्लवीने रागाने डोळे मोठे करत विचारलं.

“शट अप, पल्लवी! रितू वेडी नाहीय.” राजेशचा आवाजही वाढला होता.

“नाहिये ना वेडी? मग तिला त्या चांदोरकरांच्या हॉस्पिटलमधे का ठेवून आलास तू? अरे तिला काय वाटलं असेल, याचा विचार केलास का?”

“मला तिचा आणि तुमच्या दोघांचाही विचार करायचा होता, म्हणून तिला तिकडे ठेवून आलोय. तुला काही माहित नाहीये, इकडे काय झालंय ते.”

“तेच ना! आज अचानक परत आले नसते, तर तेही माहित झालं नसतं.”

पल्लवीला कसं समजावून सांगावं ते राजेशला समजत नव्हतं. त्याने हताश होऊन पल्लवीचे दोन्ही खांदे धरले.

“पल्लवी.... मी खरंच जास्त काही समजावून सांगण्याच्या मन:स्थितीत नाहीये. रितूला मी फक्त दोन दिवसांसाठी तिकडे ठेवून आलोय. तेही तू आणि मनू इथे सुरक्षित असावेत म्हणून. मला आत्ता ताबडतोब आनंदगावला निघायचंय. तू आता आलीच आहेस तर प्लीज.... तुझी कामं कॅन्सल कर नाहीतर मला मनूला त्याच्या मावशीकडे पाठवावं लागेल.”


पल्लवीच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं.

“त्यादिवशी वहिनी तसं म्हणाली आणि आज दादाही तेच म्हणतोय.... हे दोघेही आपलं कुटुंब सुरक्षित रहावं म्हणून नेमकं करतायंत तरी काय?.... आणि मला का सांगत नाहीय कुणीच काही?.... सुरक्षा का, कशापासून काहीच कळत नाहीये.”

दारावरच्या बेलने तिची तंद्री भंग पावली.

“दादा परत आला वाटतं.” पल्लवी धावतच हॉलमधे आली. मनूची झोप तिला डिस्टर्ब करायची नव्हती.

दार उघडल्यावर पल्लवी चकितच झाली.

“वहिनी तू? अगं तू तर चांदोरकरांच्या सॅनिटोरियममधे होतीस ना?”

रितू तिला काही उत्तर न देता तिचा हात बाजूला करून आत शिरली. पल्लवी तशीच चेहे-यावर प्रश्नचिन्ह घेऊन रितूकडे पहात होती.

“शट द डोअर.” रितूने आज्ञेच्या सुरात पल्लवीला फर्मावलं.

पल्लवीने तिच्याकडे पहात पहातच दरवाजा बंद केला. रितू काही वेगळीच दिसत होती. तिच्या गो-या कातडीवर किंचित काळपटपणा चढला होता. केसांच्या जटा झाल्या होत्या. चेहरा ओढलेला दिसत होता. डोळ्याची पापणीही न लवू देता ती पल्लवीकडे पहात होती.

पल्लवी मनातून चांगलीच घाबरली होती पण उसनं अवसान आणत तिने रितूला पुन्हा विचारलं. “वहिनी, तुला हॉस्पिटलमधून सोडणार होते तर तिथून फोन करायचास ना!”

“राजेश कुठे आहे?” रितूने पुन्हा इंग्रजीतच विचारलं.

“तो.... अं.... तो....”

“कुठाऽऽय तो?” रितू किंचाळली.

अचानक तिच्या चेहे-यात विलक्षण बदल झाले. कातडीचा काळपटपणा संपूर्ण अंगावर पसरला. डोळ्यातील काळ्या बाहुल्या दिसेनाश्या झाल्या. दात विचकून ती पल्लवीकडे पहात होती. तिचा तो अवतार पाहून पल्लवीने जिवाच्या आकांताने किंकाळी फोडली.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------