पान १७


“याला ’मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ असं म्हणतात,” डॉ. चांदोरकरांनी डोळ्यावरचा चष्मा काढत म्हटलं.

“मी ऐकून आहे याबद्दल पण डॉक्टर, रितूला हे कशामुळे झालं असावं?” राजेशने काळजीच्या सुरात विचारलं.

“तुम्ही मगाशी मला सांगितलंत की तुमच्या पत्नीचा भूतं-खेतं, जादू-टोणा यासारख्या गोष्टींवर विश्वास आहे. भितीमुळे तसले सिनेमे पहाणंसुद्धा त्या टाळतात....”

“हो ना! सारखं आजारी असल्यासारखं वाटतं, असं म्हणते ती. अचानक खुनशी वागायला लागते. अचानक ती एकदम शांत होते....”

“एक्झॅटली, मिस्टर कासले. अशा कमकुवत मन असलेल्या लोकांच्या बाबतीत कधीकधी काय होतं की त्यांनी एखादी भूताखेताची कथा ऐकलेली असते आणि आत्यंतिक भितीतून आपण ज्या गोष्टीबद्दल ऐकलेलं असतं, ती आपल्याच बाबतीत घडतेय असं त्यांना वाटत रहातं. हल्लीच रिलीज झालेला “भूलभुलैया” नावाचा चित्रपट पाहिलाय तुम्ही?”

“नाही. पण कथा माहित आहे.”

“तसंच काहीसं घडतंय तुमच्या पत्नीच्या बाबतीत. अहो इथे तर एका शरीरात दोन व्यक्तीमत्त्वांचा संघर्ष आहे, काही काही प्रकारांत तर एका शरीरात तीन-चार व्यक्ती दडलेल्या असतात!”

“अरे बापरे!”


“बाय द वे.... तुम्ही तुमच्या मिसेसना केव्हा पासून ओळखता?”

“जवळ-जवळ दहा ते पंधरा वर्षं झाली. आम्ही कॉलेजपासून एकत्रच आहोत.”

“त्यांना अशा प्रकारचा त्रास याआधी कधी....”

“कधीच नाही. खरंतर माझी आई गेल्यावर मला रितूचीच जास्त काळजी होती. पण तीच सर्वात जास्त खंबीर होती त्या वेळेस.”

“हं! तर मग तुम्ही माहिती काढाच.”

“ठीक आहे. पण.... एक अडचण आहे.”

“सांगा ना.”

“रितू कशी वागते, ते तुम्ही पाहिलतच. मी नसताना ती अशी वागायला लागली तर तिला कोण सावरणार?.... माझी बहीण तिच्या नियोजित पती सोबत एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी बाहेर असते. तिला अजून या प्रकाराची मी कल्पनाही दिलेली नाही. माझा मुलगा दिवसभर आयासोबत राहिल पण रात्रीचं काय?”

डॉक्टर स्मितहास्य करत राजेशकडे पहात होते.

“याचसाठी त्यांना माझ्या सॅनिटोरियममधे ठेवा असं म्हणालो होतो मी.”

राजेश खाली मान घालून म्हणाला, “आता तोच पर्याय जास्त योग्य वाटतोय मलाही.”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------