पान १६रितू अजूनही अस्वस्थपणे स्वत:च्या हातरूमालाशी चाळा करत बसून होती. खरं तर डॉक्टरांचं आणि राजेशचं आत चाललेलं संभाषण तिला ऐकायचं होतं पण स्वत: डॉक्टरांनीच तिला बाहेर बसायला सांगितल्यावर तिचा नाईलाज झाला. तिचं एक मन म्हणायचं, "राजेश बाहेर आला की सांगेलच ना!", तर दुसरं मन म्हणायचं, "सांगायचंच असतं तर बाहेर कशाला जायला सांगितलं असतं?"

पंधरा मिनिटांनंतर मात्र रितूला बसून बसून कंटाळा येऊ लागला. ती उभी राहून काचेतून आत पहात डॉक्टर आणि राजेश काय बोलतायंत याचा अंदाज घेऊ लागली. तेवढ्यात राजेशला खुर्चितून उठलेलं पाहून ती पुन्हा जागेवर जाऊन बसली.

"चल, डॉक्टर बोलावतायंत."


"बोला, मिसेस कासले. आता तर काही प्रॉब्लेम नाही ना?" त्यांनी स्मितहास्य करीत विचारलं.

“नाही. "पण मी काय सांगू? मलाच समजत नाहीये मला काय झालंय ते. आतून खूप आजारी असल्यासारखं वाटतंय. वेगाने धावावंसं वाटत असताना कुणीतरी जबरदस्तीने आपल्याला धरून ठेवलंय असं काहीतरी फिलींग येतंय...."

रितू बोलत असताना डॉ. चांदोरकर चेहेर्‍यावर कोणताही भाव न आणता तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होते. तिची नजर, हातवारे करण्याच्या पद्धती, बोटांच्या हालचाली याकडे त्यांचं बारीक लक्ष होतं.

“....मी नक्की असं सांगू शकत नाही..... मला अंधूकसं आठवतंय डॉक्टर.... पण स्वप्नात पाहिलेली ती बाईच माझा ताबा घेऊ पहातीय असं मला वाटतं."

“बरं. मिसेस कासले, तुम्हाला गावच्या घरात काही संशयास्पद वाटलं म्हणून तुम्ही गावातल्या एका बुजुर्ग माणसाला भेटायला गेला होतात म्हणे? तिकडे काय माहिती मिळाली हे तुम्ही सांगू शकाल?"

डॉक्टरांच्या या वाक्यासरशी रितू एकदम ताठरली. क्षणार्धात तिचा चेहेरा बदलला. डोळे आग ओकू लागले.

“तिने जेवढं सांगितलंय, तेवढंच खूप आहे तुझ्यासाठी. जास्त शहाणपणा केलास तर इथेच संपविन तुला.” ती गुरगुरत्या स्वरात म्हणाली आणि तिने टेबलावरचा पेपरवेट उचलला.

रितूच्या वागण्यात झालेला बदल पाहून डॉक्टरांनी सावध पवित्रा घेतला. खुर्चिवरून न उठता ते मागे सरकले. रितूच्या नकळत त्यांनी स्वत:च्या पायाखालचं बटण दाबलं. ताबडतोब त्यांचा असिस्टंट बाहेरून आत आला. त्याला पाहून राजेश ताडकन उठला आणि त्याच्या मागोमाग डॉक्टरांच्या केबीनमधे गेला.

“रितू...?” राजेशने तिला हाक मारली.

रितू काही न समजल्यासारखी डॉक्टरांकडे, राजेशकडे आणि असिस्टंटकडे आळीपाळीने पहात होती.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------