पान १२


"शी:! कसलं अभद्र स्वप्न होतं ते....!"

रितू दचकून जागी झाली आणि पलंगावर उठून बसली. तिचा श्वासोच्छवास वेगाने होत होता. पण आता भानावर आली होती ती. आपण जे पाहिलं ते स्वप्न होतं, हे लक्षात आल्यावर तिने सर्वात आधी नजर टाकली ती बाजूला झोपलेल्या मनूकडे. त्याला शांत झोपलेलं पाहून तिचा जीव भांड्यात पडला. त्याच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवून तिने तो स्वत:च्या ओठांवर टेकवला.

टेबलावरचा छोटा दिवा लावून तिने घडयाळात पाहिलं. पहाटेचे दोन वाजले होते. तिच्या घशाला चांगलीच कोरड पडली होती. टेबलावरची पाण्याची बाटली उचलून निम्मी बाटली तिने गटागट संपवली. स्वप्नामुळे मनावर पसरलेला गढूळपणा किंचित कमी झाल्यासारखा वाटला तिला. बाटलीवर हात ठेवून ती स्वत:शीच विचार करत होती.टेबलाच्या ड्रॉवरमधून माचीस काढून तिने मेणबत्ती पेटवली. मेणबत्तीच्या ज्योतीने संपूर्ण रूममधे उदासवाणा पिवळा प्रकाश पसरला. अंधारापेक्षा रितूला त्या प्रकाशाचीच जास्त भिती वाटायला लागली. तिने आजूबाजूला पाहिलं. रुममधल्या वसूंच्या लांबच लांब नि वेड्यावाकड्या सावल्या आपल्या अंगावर येतायंत असा तिला भास झाला. ती पटकन नजर वळली आणि झोपलेला मनू तिच्या दृष्टीस पडला. झोपेत मनूचा चेहेरा आणखीनच निरागस दिसत होता. त्याच्याकडे एकदा पाहून तिने दरवाजाची कडी काढली आणि बाहेर पाऊल टाकलं.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------