पान ८


सदाच्या सगळ्या अंगावर माराचे वळ उठले होते, तरीही मांत्रिक काही त्याला मारायचं थांबला नव्हता. दोरखंडांनी एका खांबाला बांधलेला सदा वेदनांनी कळवळत होता, विव्हळत होता. त्याच्या घरच्यांनाही त्याचं हे दु:ख पहावत नव्हतं पण सदाला भुताटकीच्या तावडीतून सोडवायचा हाच एक उपाय होता. काल रात्री सदा धावतपळत घरात शिरला आणि एका कोपर्यानत तोंडावर हात ठेवून धापा टाकत बसून राहिला. त्याची आई त्याची विचारपूस करायला जवळ गेली, तर त्याने तिलाच ढकलून दिलं. तोंडाने ’हऽऽहऽऽहऽऽहऽऽ’ असा आवाज काढत सदा थरथर कापत कोपर्‍यातच बसून राहिला. त्याची बायको सासूला उठवायला गेली तर हा डोळे वटारत तिच्याही अंगावर धावून गेला. मग त्या दोन बायका घाबरतील नाहीतर काय?मांत्रिक मोठ-मोठ्याने हसला. "समद्यी भुतं आदुगर आसंच म्हनत्यात. नंतर लाईनीवर येत्यात. तू सदाच्या आंगातून जोवर भायीर पडत न्हाईस तवर तुला आसाच मार खावा लागनार." असं म्हणून मांत्रिकाने समोरच्या ताटातून अंगारा घेऊन तो सदाच्या अंगावर टाकला. बाजूला पेटवलेल्या अग्निमधे पुन्हा काहीतरी टाकलं. अग्नि भडकला. सदा खोकून खोकून हैराण झाला होता. मांत्रिक पुन्हा हसला.

"बगितलं, बगितलं. कसं तडफडतंय बगा! पन सदाला सोडायला तयार न्हाई ते. ह्येच्यासाठी आनखी जालीम उपाय करावा लागनार हाय."

आता हा बाबा आणखी काय सांगतो करायला? अशा अविर्भावात सदाच्या बायकोने त्या मांत्रिकाकडे पाहिलं. ती आधीच हे सर्व पाहून हैराण झाली होती. नवर्‍याला भुताटकीच्या तावडीतून सोडवण्याचा हा अघोरी उपाय तिला अजिबात आवडला नव्हता पण सासूपुढे तिचं काही चालत नव्हतं.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------