पान ३


दारूच्या रुपात सटवाईनेच गावामधे प्रवेश केला. दारू स्वस्तात मिळते म्हणून ओकेपर्यंत पिऊन पुरूष माणसं घरातच पडून राहू लागली. कामावर कुणी जाईना आणि त्यांच्या बायकांच्या डोळ्याचं पाणी काही खळेना! घरातला खर्च भागवायला पैसा नाही म्हणून कर्ज मागायचं तरी कुणाकडं आणि ते फेडायचं कसं? याच विवंचनेत गावच्या बायका राहू लागल्या. एके दिवशी रखमाने निर्धार केला. दहा बायकांना गोळा केलं आणि गेली सरपंचाच्या घरावर मोर्चा घेऊन.

"सरपंच, तुमच्या भावाला हे दारू भट्टीचं काम बंद करायला लावा. आमचं धनी असं घरात पडून राहू लागलं, तर आमी खायचं काय वो?" रखमाने धीटपणे प्रश्न केला.

"आरं तिच्या! कोन सांगतंय तुझ्या धन्याला घरी पडून र्‍हा म्हून आं? त्येचा तो येतो, पितो आन् घरला निगून जातो." तुकाजीने पुढे होऊन उत्तर दिलं.मळकट हाफ चड्डी, शर्टाचं वरचं बटण तुटल्यामुळे शर्ट एका खांद्यावरून खाली ओघळलेला, केस भुरभुरलेले आणि डोळ्य़ातलं पाणी पुसत बिट्ट्या दरवाजा टेकून मुसमुसत होता.

“काय रं बिट्ट्या? साळंतून पळून आलास व्हय रं?” रखमाने पोराला अवेळी घरात आलेलं पाहून विचारलं.

बिट्ट्याने नुसतीच नकारार्थी मान हलवली आणि बोलायला सुरूवात केली. “मास्तर म्हनत्यात, तीन महिनं झालं, साळंची फी दिल्याली न्हाई. आता पैकं दिल्याबिगर साळंत घेनार न्हाई, म्हनले मास्तर.”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------