पान १३


सदाच्या घरून रामचंद्र आवेशात घराच्या बाहेर पडला खरा पण पुढे कसं काय करायचं हे काही त्याने ठरवलेलं नव्हतं. काही अंतर पुढे गेल्यावर तो थांबला. त्याच्या डोक्यात विचारचक्र गतीने फिरत होतं. हा प्रकार भुताटकीचा नाही, हे त्याला कळून चुकलं होतं. पण दारूच्या नादी लागलेल्या गावकर्‍यांना अद्दल घडायलाच हवी होती आणि तुकाजीलासुद्धा. त्याच्याच दारूच्या भट्टीमुळे गावात दारू पाण्यासारखी वाहू लागली होती. जर भट्टी आणि गुत्ता बंद झाला तर "भुताटकी"देखील आपोआपच थांबणार होती. या समस्येवर कायमचा उपाय कसा करावा याचा रामचंद्र विचार करत होता."दौलती, कसंबी करून आज रातच्यालाच ह्ये काम उरकलं पायजे." रामचंद्र म्हणाला.
"काम हुईल पन तुजं काय गड्या?" दौलतीने काळजीने प्रश्न केला.
"कायतरी मिळवायचं तर कायतरी गमवावंबी लागतंच." रामचंद्र म्हणाला.
"आरं पर तुज्या जीवावर बेततंय ह्ये." दौलती म्हणाला.
"ठावं हाय. पन म्या फकस्त माज्या भनीसाटी न्हाई करत ह्ये. गावातल्या समद्या बाया माज्या आया-भनीच हाईत. आशी भुताटकी उदगावात आली त्ये चांगलंच झालं पन हे जास्त दिस चाललं तर भुताटकी म्हंजी काय व्हतं हे समद्यांलाच कळंल पन आवरायला भारी भारी पडंल. आत्ताच बंदुबस्त क्येला पायजे." रामचंद्राने एक सुस्कारा सोडला. "चल, म्या निगतो. सांगितलेलं समदं लक्षात हाये ना तुज्या?"

दौलतीने होकारार्थी मान डोलावली. त्याच्या पाठीवर थोपटत रामचंद्र म्हणाला, "माजी समदी मदार आता तुज्यावर हाय गड्या."

"काळजी करू नगंस. म्या तुला सबुत दिलाय." दौलती म्हणाला. रामचंद्र त्याच्या निरोप घेऊन घराबाहेर पडला.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------