पान १०


रामचंद्राने घरात पाऊल ठेवलं आणि समोरचं दृश्य पाहून तो अवाक्‌च झाला. अंगावर माराचे वळ घेऊन दोरखंडांच्या वेटोळ्यात निपचित पडलेला सदा, त्याच्या डोक्यावरून हात फिरवरणारी त्याची आई आणि मोरपिसाचा झाडू सदाच्या सर्वांगावरून फिरवत काही-बाही पुटपुटणारा एक मांत्रिक. रामचंद्र काय समजायचं ते समजून गेला. तो पटकन पुढे झाला आणि त्याने मांत्रिकाला बाजूला व्हायला सांगितलं. पण मांत्रिक जागचा हलला नाही. उलट सदाची आई रामचंद्राला उलट सुलट बडबडू लागली. पण रामचंद्र अशाने बधणार नव्हता. त्याने सदाच्या आईकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ मांत्रिकाच्या बखोट्यात हात घालून त्याला मागे खेचलं.सदाची आई आ वासून दरवाजाकडे पहात होती. रामचंद्र तिला हसून म्हणाला, "काय आत्या, कुनाच्या तावडीत सोपिवला व्हता पोटच्या पोराचा जीव?" मग तो कमळीला म्हणाला, "जा कमळे, थोडं गरम पानी करून आन शेकायला आनि चा ठीव थोडा."

कमळी आत निघून गेली. रामचंद्राने सदाचे हातपाय सोडले. त्याला भिंतीला टेकून नीट बसवलं. त्याचे कपडे व्यवस्थित केले. सदा थकलेल्या डोळ्यांनी रामचंद्राकडे पहात होता. पण त्याच्या काहीही हालचाल करण्याची वा बोलण्याची शक्ती उरली नव्हती, इतका मार खाऊन थकला होता तो. रामचंद्राला त्याची कीव आली. स्वत:च्या मालकीची जमीन कसायची सोडून दोन वेळेला मिळणार्‍या फुकट दारूसाठी सदाने हातभट्टीवर दारू गाळायची नोकरी पत्करली होती. तुटपुंज्या कमाईमुळे होणार्‍या घराच्या दुर्दशेपेक्षा त्याला फुकट मिळणारी दारू जात मोलाची वाटत होती. रामचंद्राच्या कानावर हे सर्व आलं होतं पण तो कमळीपेक्षा पाच वर्षांनी मोठा होता. विचार करून कृती करणं हे त्याच्या स्वभावतच होतं. बहिणीच्या संसारात उगाच का लक्ष घाला म्हणून त्याने मनावर घेतलं नव्हतं. पण दोनच दिवसांपूर्वी उदगावातील भुताटकीची माहिती त्याच्या कानावर आली आणि आपल्या बहिणीचं क्षेमकुशल स्वत: जाणून घेण्यासाठी तो अचानक तिच्या घरी येऊन थडकला. खरं तर हे सुदैवच म्हणायचं सदाचं, नाहीतर आज मांत्रिकाच्या तावडीतून त्याची सुटका नव्हती.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------