पान ४१


दुसर्‍या दिवशी दुपारी देवदत्तांनी मोहिनीला फ़ोन करून ऑफ़िसमध्ये घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितलं. ते ऐकून तिलाही बरं वाटलं. मोहिनीला डान्सच्या ऑफ़र येत होत्या पण निदान एक महिनाभर तरी कोणतीही ऑफ़र स्विकारायची नाही असं ठरवून ती घरी बसली होती. पण तिने अचानक निर्णय बदलला होता.

"का गं? तू तर म्हणत होतीस, क्लास आहेत, ईंडियातील शोज आहेत.. मग, अचानक?"

"नाही, जाते. चांगल्या ऑफर्स कशाला सोडायच्या?

"हं, तेही खरंच म्हणा.."

"देव, आज मला भेटशील, संध्याकाळी?"

"आज? हो, भेटेन ना! अशी परवानगी का मागतेयंस?"

"नाही रे, सहजच. तु सुद्धा बिझी असतोस ना?"

"ईट्स ओ.के. थोडा वेळ तर देऊच शकतो मी तुझ्यासाठी. भेटू आपण संध्याकाळी. बोल, कुठे भेटायचं?"

"माझ्या घरी." मोहिनी म्हणाली.

"चालेल."

देवदत्त विचारात पडले. मोहिनीने त्यांना असं कधी भेटायला बोलावलं नव्हतं. पण ते संध्याकाळी तिच्या घरी गेले. मोहिनी त्यांचीच वाट पाहात बसली होती. इकडच्या तिकडच्या गप्पा करून झाल्यावर मोहिनी देवदत्तांना म्हणाली, "देव, आय वॉन्ट टू थॅंक यू फ़ॉर दॅट डे."

"थॅंक यू कशाबद्दल?"

मोहिनीला कसं बोलावं ते समजत नव्हतं, "अरे, मी त्यादिवशी खूपच इमोशनल झाले होते. हल्ली असं होत नाही पण तो दिवसच..."

"मी काही बोललो का, त्यावरून तुला?" देवदत्त.

"नाही. पण तरीसुद्धा,देव. थॅंक यू." मोहिनी."मोहिनी, तुझ्या करियरच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा तर तुझ्यासोबत नेहमीच आहेत पण कधीही, कुठेही, कशासाठीही तुला हाक माराविशी वाटली तर दहा वेळा विचार करत बसू नकोस. ताबडतोब माझा नंबर डायल करायचा. काय?"

मोहिनीने समजल्यासारखी मान डोलावली.

"देव, मी आत्ता जे कॉन्ट्रॅक्ट केलंय ना, त्याच्यामुळे मला पुढचे तोन-तीन महिने तिकडेच राहावं लागणार आहे म्हणून म्हटलं तुला भेटून जावं."

"दोन-तीन महिने? ठीक आहे पण आल्यावर मागल्या वेळेसारखाच फ़ोन मात्र नक्की कर." देवदत्त.

"हो, नक्की करेन." मोहिनी.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------