पान ४०


"मी समजू शकतो. असेही महाभाग आहेत या जगात. पण मोहिनी, आज हे सर्व समजल्यावर मला तुझ्याबद्दल असलेला आदर आणखीनच वाढला आहे. इतकं मोठं दु:ख पचवून स्वत:च्या पायावर उभं राहायचं आणि जगायचं!....खूप जिद्दी आहेस तू! एक मैत्रीण म्हणून मला तुझा अभिमान तर वाटतोच पण एक स्त्री म्हणून मला तुझं कौतुक करावंसं वाटतं." देवदत्त म्हणाले.

"अरे, काय बोलतोयंस?"

"खरंच मोहिनी, तु जे सांगितलंस, ते ऐकणं खूप सोपं आहे पण त्या अनुभवातून प्रत्यक्ष जाणं फ़ार कठीण!"

"तुला एक विचारू मोहिनी? राग नाही येणार ना?" देवदत्त म्हणाले.

"विचार ना!"

"तुला कधी माझी भिती नाही वाटली. म्हणजे तू मला पहिल्यांदा पाहिलंस तेव्हा तर मी शुद्धीतही नव्हतो.."

"देव, प्रत्येक दारू पिणारा माणूस वाईट असलाच पाहिजे का?...आणि वाईट माणसं निर्व्यसनी असू शकत नाहीत का? मला तुझ्या नजरेत कधीच पाप आढळलं नाही देव. इतकं माझ्यासाठी पुरेसं आहे."

देवदत्त तिच्याकडे पाहून हसले.

मोहिनी आता ती बरीच सावरलेली होती. तिने देवदत्तांना विचारलं, "अरे, पण तु आज अचानक कसा काय आलास?"

देवदत्तांनी मोहिनीला सुयोगच्या वाढदिवसाला येण्याचं आमंत्रण दिलं. थोडावेळ मोहिनीसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा करून, तिच्या हातचा चहा घेऊन, ती आता व्यवस्थित सावरल्याची खात्री पटल्यावरच, ते तिच्या घरातून बाहेर पडले.

सुयोगच्या वाढदिवशी देवदत्तांनी मोहिनीची त्यांच्या घरातल्या सर्वांशी तिची ओळख करून दिली. सुयोगशी तर तिचं पटकन सूत जुळलं. त्याच दिवशी देवदत्तांनी सर्वांसमोर जाहिर केलं की शेखर उद्या ’यज्ञ’चा फ़िफ़्टी परसेंट पार्टनर होणार आहे.

देवदत्त त्याला म्हणाले, "शेखर, हा फ़ोटो मी आजपर्यंत का जपून ठेवला माहितीय? तुला देण्यासाठी नाही. तर तुला हे सांगण्यासाठी की वरवर तु कितीही तुटला असशील माझ्यापासून, तरी तुला फ़ार दूर जाऊ देणार नाही मी."

देवदत्तांनी त्याच्या खांदयावर थोपटल्यासारखं केलं आणि त्याला कॉन्फ़रन्स हॉलमध्ये आणलं. दिनकरराव, मालतीबाई, शालिनी, सुयोग, ऑफ़िसचे इतर कर्मचारी आणि देवदत्तांचे काही निवडक समव्यावसायिक त्या दोघांची वाट पाहत होते. सर्वांनी त्या दोघांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. पार्टनरशीपच्या करारावर अजून स्वाक्षर्‍या होणं बाकी होतं पण स्वाक्षर्‍या झाल्यानंतर, सेलिब्रेशन म्हणुन देवदत्तांनी खास ऑफ़िसच्या कर्मचार्‍यांसाठी एक छोटीशी पार्टी आयोजित होती.

कराराच्या कागदपत्रांवर सर्वप्रथम दिनकररावांनी स्वाक्षरी केली. या स्वाक्षरीने त्यांची 'यज्ञ'मधील पार्टनरशीप रद्द झाली.
त्यानंतर देवदत्तांनी स्वाक्षरी करून शेखरची पार्टनरशीप मंजूर केली. मग त्यांनी कराराचे कागदपत्र शेखरच्या पुढ्यात सारले. शेखर निश्‍चलपणे त्या कागदपत्रांकडे पाहात बसला होता. देवदत्तांनी त्याला स्वाक्षरी करण्यासाठी खूण केली पण त्याने हातातलं पेन बाजूला ठेवलं आणि कराराचे कागदपत्र फ़ाडून टाकले आणि म्हणाला, "देव, मला नाही बनायचं पार्टनर या कंपनीत."

त्याच्या या वाक्यासरशी संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. दिनकरराव आणि देवदत्तही त्याच्या कॄतीने आश्‍चर्यचकित झाले. शेखर देवदत्तांच्या जवळ जात म्हणाला, "देव, तुला ओळखण्यात मी खूप चूक केली.. मला सारखं असं वाटायचं की माझ्या वाटणीचं सर्व, मी तुझ्यामुळे गमावून बसलोय आणि त्यातूनच ..." शेखरला पुढे बोलता आलं नाही, त्याने देवदत्तांना मिठी मारली आणि म्हणाला, "देवा, मी तुझ्याशी किती वाईट वागलो. मला क्षमा कर.."

सुयोगच्या त्या वाक्यासरशी संपूर्ण हॉलमध्ये खसखस पिकली. शेखर आणि देवदत्त दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. शेखरने देवदत्तांचा हात आपल्या हातात घेऊन तो उंचावला आणि म्हणाला, "ज्या पार्टनरशीपची गरज मला होती, ती आज मला मिळालीय."

टाळ्यांच्या कडकडात सर्वांनी नव्या शेखरचं स्वागत केलं आणि एका आगळ्याच पार्टनरशीपचं सेलिब्रेशन करण्यासाठी जमलेले सर्व जण उत्सुक झाले.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------