पान ३७


हॉटेलमधील दिव्यांच्या निळसर प्रकाशात मोहिनीचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. देवदत्तांनी मोहिनीला तशी कॉम्प्लीमेंटसुद्धा दिली. डिनरची ऑर्डर दिल्यानंतर देवदत्त आणि मोहिनीने गप्पा मारायला सुरूवात केली.

"जवळ-जवळ एक महिन्यानंतर भेटलो आपण, नाही?" देवदत्त म्हणाले.
"दिड-महिना," मोहिनीने लगेच दुरूस्ती केली.
"एव्हढे दिवस झाले? बघ! कामात कसा वेळ जातो, ते हल्ली कळतंच नाही."
"हो, ना! बाय द वे, हल्ली तुझी आणि शेखरची दिलजमाई झालीये असं तू सांगत होतास त्यादिवशी.." मोहिनीने विचारलं.
"दिलजमाई की आणखी काही...माहित नाही...पण हल्ली आमच्यामधला कडवटपणा निश्‍चितच कमी झाला आहे, एव्हढं नक्की. ऑफ़िसचं काम तर तो खरंच खूप चांगल्या रितीने सांभाळतो." देवदत्त म्हणाले.
"चल, ते एक बरं झालं." मोहिनी म्हणाली.
"याचं क्रेडिट तुलाच बरं का? त्यादिवशी तू जे बोललीस ना, त्याच्यावर मी खूप विचार केला. स्वत:च्याच विचारांमध्ये आणि वागण्यात थोडे बदल केले आणि आज रिझल्ट समोर आहे. यू नो व्हॉट, त्यादिवशी मी पहिल्यांदा माझ्या संपूर्ण कुटूंबासमवेत डिनरला बाहेर गेलो होतो. आम्ही खूप एंन्जॉय केलं." देवदत्तांच्या चेहेर्‍यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
"अरे वा! आय अॅम व्हेरी, व्हेरी हॅप्पी फ़ॉर यू, देव. तुला पहिल्यांदा पाहिलं होतं, तेव्हाचा देव आणि आताचा देव यात किती फ़रक आहे!" मोहिनी कौतुकाने म्हणाली.

मोहिनी हे बोलत असताना वेटर त्यांची ऑर्डर घेऊन आला आणि त्यांचं संभाषण तिथेच थांबलं.

संगीताच्या मंद सुरावटींचा आनंद घेत, गेल्या दिड महिन्याभरातल्या घडामोडींवर गप्पागोष्टी करत त्यांनी जेवण संपवलं आणि थोडं चालावं म्हणून ते बाहेर पडले. समोरच एक कृत्रीमरित्या बांधलेला तलाव होता. त्याच्या सभोवती फ़ेरफ़टका मारता यावा म्हणूण फ़रशा टाकून गोलाकार वाट तयार करण्यात आली होती. काही ठराविक अंतरावर लावलेल्या दिव्यांमुळे ती वाट उजळून निघाली होती. काही वेळ ते दोघंही त्या वाटेवरून नि:शब्द चालत होते. अचानक देवदत्त मंद हसले आणि मोहिनीकडे पाहून म्हणाले, "तुला माहितेय मोहिनी? माझ्या आयुष्यातील तू पहिली मैत्रीण आहेस."

"घरच्यांना तरी वेळेवर फ़ोन करतेस ना, नाहीतर एके दिवशी तेच यायचे इकडे बघायला की आमची मुलगी कुठे गायब झाली म्हणून." देवदत्त सहज बोलून गेले.

मोहिनी त्यांच्या या विनोदावर बळेबळेच हसली. देवदत्तांच्या ते लक्षात आलं.

"मोहिनी तुला एक विचारू? राग येणार नाही ना?" देवदत्तांनी असा प्रश्‍न विचारल्यावर, ते काय विचारणार आहेत याचा थोडाफ़ार अंदाज तिला आला होता पण या प्रश्‍नाचं उत्तर काय द्यावं हेच तिला समजत नव्हतं.

"...विचार ना!"

"कुठला आहे हा परफ्यूम? चेंज करशील का? मला ह्या परफ़्यूमची अॅलर्जी आहे गं."

"परफ़्यूम..? काय?" अनपेक्षित प्रश्‍न आल्याने तिला नीट रिअॅक्टही होता येत नव्हतं.

"हं. परफ़्यूम...चेंज करशील? प्लीज."

मोहिनी अजूनही गोंधळलेल्या चेहेर्‍याने देवदत्तांकडे पाहात होती.

"अगं अशी काय पाहातेयंस? अशी काही फ़ार मोठी गोष्ट नाही मागितली मी. निदान मला भेटताना तरी हा परफ़्यूम वापरू नकोस, प्लीज."

"हे विचारायचं होतं तुला?"

"हो! का? तुला काय वाटलं?"

"नाही...काही नाही." आपला गोंधळ लपवत मोहिनी म्हणाली, "चल, निघू या?"

"कुठे चाललीस? पार्टी घेतलीस ना? गिफ़्ट कुठाय?"

"काय लहान आहेस का गिफ़्ट घ्यायला?" मोहिनीने त्यांचंच वाक्य त्यांना ऐकवलं. ती आता व्यवस्थित सावरली होती.

"हेच तुझं आवडत नाही मला, मोहिनी. अगं, लहान असलं म्हणजेच गिफ़्ट द्‍यायचं असतं, असा काही नियम नसतो. ते काही नाही, मला गिफ़्ट पाहिजे, म्हणजे पाहिजे."

देवदत्तांनी आपल्याच वाक्याची सही सही नक्कल केलेली पाहून मोहिनी खळखळून हसली, "बोल, काय गिफ़्ट पाहिजे?"

"गिफ़्ट मला मिळालंय, मोहिनी. तुझी मैत्री! माझ्यासाठी हे सर्वात मोठं गिफ़्ट आहे. आणखी एखादं गिफ़्ट द्‍यायचा विचार असेल, तर सांगतो, अशीच हसत राहा.."

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------