पान ३६


"तसं मी कसं म्हणेन काका? उलट शेखरच्या वाटणीचं प्रेमसुद्धा तुम्ही मला दिलंत. तुम्ही होतात म्हणून मी आज आहे. आई-बाबांची उणीव काय असते हे मला तुमच्यामुळे आणि काकूमुळे कधी समजलंच नाही. पण मी काय दिलं तुम्हाला? शेखरचा तिरस्कार, त्याचे शिव्याशाप..?" देवदत्त उद्वेगाने बोलत होते.

"अरे, काय बोलतोयंस देवा? तु काही केलेलं नाहीस. शेखरचा स्वभाव सुरुवातीपासूनच तसा होता. त्याला तू कारण नाहीस. जो, तो आपल्या कर्मफ़ळांवर जगतो. तू काय, मी काय आणि शेखर काय?...आणि आजच हे असं बोलायची काय गरज पडली?"

स्वत:ला सावरून घेत देवदत्त म्हणाले, "काही नाही काका, नवीन प्रोजेक्टची फ़ाईल शेखरला दिलीय. त्याला काही अडलं तर जरा मदत करा. मला माहित आहे तुम्हाला आवडलेलं नाही हे पण..."

"मी त्याला मदत करेन, देव. तो इथली प्रोजेक्ट्स बर्‍यापैकी सांभाळतोय. एखादा फ़ॉरिन क्लायंट त्याच्याकडे द्‍यायला हरकत नाही. काल आपण बाहेर गेलो असताना, मी उगीचच ओव्हररिअॅक्ट झालो असं मला वाटलं." मग एक क्षण थांबून ते म्हणाले, "बरं.., त्याला ह्या कंपनीतील अर्धी पार्टनरशीप देण्याचा तुझा विचार पक्का आहे?"


"हॅलो..."
"हॅपी बर्थ डे, टु यू..., हॅपी बर्थ डे, टु यू.." पलिकडून मोहिनी उत्साहाने गात होती.
"अरे! तुला कसं कळलं?" चकित झालेले देवदत्त बेडवर उठून बसत म्हणाले.
"हा, हा, हा!" नाटकी हसत मोहिनी म्हणाली. "कसं कळलं ते जाऊ देत पण कळलं की नाही?"
"बरं बाबा, ठीक आहे. थॅंक्यू."
"इतने सस्तेमें हम नही कटनेवाले. पार्टी दे." मोहिनी.
"काय लहान आहे का मी, बर्थ-डे पार्टी द्‍यायला?"
"हेच! हेच तुझं आवडत नाही मला, देव. लहान असलं म्हणजेच असं काही करायचं, असा काही नियम नसतो. ते काही नाही, मला पार्टी पाहिजे, म्हणजे पाहिजे."
"बरं बाई, देतो. आधी भेट तर खरी! तुझे शोज, क्लास याच्यातून तुला फ़ुरसत मिळाली की खुश्शाल घे पार्टी."
"हो ना, मग चल, आज भेट मला संध्याकाळी. मी आता एक महिना कोणताही शो करणार नाहीये. मला वेळच वेळ आहे."

मोहिनी आज भलतीच मूडमध्ये दिसत होती. शेवटी तिचं म्हणणं मान्य करून देवदत्तांनी तिला संध्याकाळी हॉटेल पॅराडाईज मध्ये भेटण्याचं नक्की केलं.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------