पान ३४


आज घरातले सर्वचजण चकित झाले होते. शेखरच्या आणि देवदत्तांच्या लग्नाचा दिवस सोडला, तर आजपर्यंत संपूर्ण कुटुंब असं हास्यविनोद करत कधी जेवलंच नव्हतं. संपूर्ण कुटुंबाने जेवणासाठी एकत्र बाहेर जाणं हा प्रकार तर त्यांच्या घरात नवीनच होता. जेवण झाल्यावर आईसक्रिम खाता खाता, देवदत्तांनी ’हॉवर्ड अॅण्ड विल्सन’च्या प्रोजेक्टचा विषय काढला. ते शेखरला म्हणाले, "शेखर ह्या प्रोजेक्टचा इन-चार्ज तू असणार आहेस तेव्हा..."

"व्हॉट?" दिनकरराव आश्‍चर्याने म्हणाले.

आश्‍चर्य शेखरलाही वाटलं होतं पण त्याने काही बोलण्याआधीच दिनकररावांनी अशी काही रिअॅक्शन दिली की त्याने खुन्नसने दिनकररावांकडे एक कटाक्ष टाकला. देवदत्तांच्या नजरेतून ते सुटलं नाही. लक्षात आलं नाही असं दाखवत ते म्हणाले, "हो काका, हे काम शेखरच सांभाळणार. अहो, आता ’यज्ञ’चा फ़िफ़्टी परसेन्ट पार्टनर होणार आहे तो. जबाबदारी पेलण्याची सवय त्याला असायला नको?"

मालतीबाई आणि शालिनी दोघीही अवाक् होऊन देवदत्तांचं बोलणं ऐकत होत्या. शेखर आणि दिनकरराव यांच्यासाठी हा दुसरा धक्का होता.

दिनकरराव दुखावलेल्या स्वरात म्हणाले, "काय अमेरिकेहून आल्यावर धक्क्यावर धक्के द्‍यायचे, असं ठरवून आला होतास?"

"नाही. असं ठरवलं नव्हतं पण गेल्या सहा महिन्यात शेखरने बिझनेस व्यवस्थित सांभाळला आहे. त्याची प्रोगेस पाहिल्यावरच त्याला पार्टनर करण्याचा विचार मी केला आहे आणि शेवटी माझ्या मागे त्यालाच हे सर्व पाहायचंय...."

"अरे देव, अशी निर्वाणीची भाषा माझ्यासारख्या म्हातार्‍याने करायची.."

"शारदा म्हातारी नव्हती, काका."

घरी जाताना सुयोगने दिनकररावांची पाठ सोडली नाही. दिनकरराव त्याच्याशी खेळण्यात गुंग आहेत, असं पाहून देवदत्तांनी शेखरला दुसर्‍या दिवशी ऑफ़िसमध्ये त्यांच्या केबीनमध्ये येण्यास सांगितले.

शेखरला हा सर्व प्रकारच संशयास्पद वाटत होता पण सध्या त्याचे हात दगडाखाली अडकलेले होते म्हणून जास्त काही न बोलता फ़क्त "येतो" एव्हढं म्हणून तो गप्प बसला. पण त्याच्याही मनात विचारचक्र सुरू झालं की कालपर्यंतच्या कठोर देवदत्तामध्ये आज एव्हढे बदल अचानक कसे काय झाले?

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------