पान ३२


"हं काय? काहीतरी बोल ना!" देवदत्त म्हणाले.

"काय बोलू, देव? तू स्पष्टिकरण दिलंस. मी ते ऐकलं." मोहिनी म्हणाली.

"खरी परिस्थिती आहे ही. स्पष्टिकरण नाही," तिला आपलं म्हणणं पटलेलं नाही असं पाहून देवदत्त पुढे म्हणाले, "शेखर लहानपणापासून मला पाण्यात पाहातो. त्याच्याबाबतीत जरा कुठे खुट्ट झालं ना की मलाच जास्त टेन्शन येतं."

"का बरं?" मोहिनीने विचारलं.

देवदत्तांनी त्यांचे आणि शेखरचे लहानपणापासूनचे घडत आलेले किस्से मोहिनीला ऐकवले. मोहिनीने सर्व ऐकून घेतलं आणि मग ती म्हणाली, "अच्छा! म्हणजे थोडक्यात तुझ्या काकांना आपल्या मुलाचं वागणं पटत नाही म्हणून त्यांची त्याच्याबाबत सक्तीची भूमिका आहे पण शेखर याचं खापर तुझ्या माथ्यावर फ़ोडतो. शिवाय काकांची तुझ्यावर मर्जी असल्याने आगीत तेल पडतं ते वेगळंच."

"हं." देवदत्त म्हणाले.

"मग तू याबाबत कधी बोलला नाहीस का त्याच्याशी?"

मग एक क्षण थांबून देवदत्तांनी मोहिनीला विचारलं, "मी स्वार्थी आहे, असं तर वाटत नसेल ना, त्याला?"

मोहिनीने उत्तरादाखल, "बघ बुवा, तुलाच माहीत," अशा अर्थी फ़क्त खांदे उचकले. थंड हवेच्या झुळूकीने तिच्या केसाची एक बट अलगद तिच्या कपाळावर रूळली होती. चंद्रप्रकाशात तिचं ते रूप लोभसवाणं दिसत होतं. त्यावर देवदत्त तिला काहीतरी बोलणार एवढ्यात हॉटेलचा नाईट डयूटी मॅनेजर राउंडवर आला. त्या दोघांना बसून बोलताना पाहिलं तसा तो त्यांच्याजवळ आला आणि अदबीने वाकून म्हणाला, "सर, मॅम... जर तुम्हाला आणखी थोडा वेळ इथे बसायचं असेल तर, वुड यू लाईक टू हॅव समथिंग?"

देवदत्तांनी रिस्ट वॉच पाहिलं आणि ते मॅनेजरला म्हणाले, "नो थॅंक यू. वी विल लीव्ह इन फ़ाईव्ह मिनीट्स."

मॅनेजर "ओ.के., गुड नाईट" म्हणून निघून गेला. मग देवदत्त मोहिनीला म्हणाले, "मॅम, चला, पहाटेचे अडीच वाजत आलेयंत." 'पहाटे’वर मुद्दाम जोर देऊन देवदत्त म्हणाले.

मोहिनी त्यांच्याकडे पाहून तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मोकळं मोकळं हसली..


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------