पान २९


"बास, बास, मोहिनी. खूप हसवलंस तू मला. आणखी हसलो तर माझं पोट फ़ुटेल." देवदत्त आपलं हसणं रोखत म्हणाले."खरंतर मला खूप दिवसांनी असं कुणीतरी बोलायला मिळालं. गेल्या कित्येक वर्षांत मी असं कुणाशी बोललेच नाहिये." मोहिनी म्हणाली.

"का? तुझी फ़ॅमिली? त्यादिवशी सुद्धा तू घरी एकटीच..."

"फ़ॅमिली नाही मला," देवदत्तांचं वाक्य तट्‍कन तोडत ती म्हणाली.

देवदत्तांनी पुढे काहीच विचारलं नाही. असतो एखाद्याचा अप्रिय विषय... पण मोहिनीच्याच ते लक्षात आलं, तशी ती म्हणाली, "नाही म्हणजे तशी फ़ॅमिली आहे पण माझ्यासोबत नाहिये ना.."

देवदत्तांनी तो विषय पुढे वाढविला नाही. ते गप्प झालेले पाहून तिनेच त्यांना विचारलं, "...अॅण्ड व्हॉट अबाऊट युवर फ़ॅमिली?"

"त्यादिवशी आली होतीस ना घरी? माझ्या काकांना पाहिलंस? तेच आमच्या घरातील मोठी व्यक्ती आहेत. त्यानंतर काकू, शेखर म्हणजे माझा चुलतभाऊ, त्याची बायको शालिनी, त्यांचा मुलगा सुयोग आणि मी.""तुला आठवतं देव, त्यादिवशी मी तुला सोडायला घरी आले होते. मी काय सांगितलं की माझ्या अपार्टमेंटच्या खाली तुझी गाडी बंद पडली होती."

"हं, बरोबर. मला हे दुसर्‍या दिवशी कळलं, आमच्या नोकराकडून.." देवदत्त म्हणाले.

"माझ्याच काय पण आमच्या संपूर्ण सोसायटीच्या प्रत्येक बिल्डींगच्या खाली एक वॉचमन असतो, त्यानेच तुझ्याकडे लक्ष दिलं नसतं का? मला खाली येण्याची काय गरज होती? शिवाय तू सोसायटीच्या मेन गेट्मधून गाडी आत आणायची म्हटलीस, तर तिथेच तुला हटकलं नसतं का गुरख्याने? कसा येणार तू आत?

"अरे, पण मग मी आलो कसा तिथे?" देवदत्त आता बुचकळ्यात पडले होते. शारदाच्या नावाचा रेफ़रन्स बाजूलाच राहिला. ही मुलगी भलतंच काय सांगतेय..

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------