पान १६


शेखरला वाटलं होतं, मुलगा दत्तक द्यायचा म्हटल्यावर शालिनी आकांडतांडव करेल पण कसलं काय? उलट तीच म्हणाली, "हातात पैसा खेळायला हवा असेल, तर ह्याच रस्त्याने जायला हवं." शेखरबरोबरच्या पाच वर्षांच्या संसारात ती पुरती शहाणी झाली होती. पण शारदा त्या दोघांनाही ओळखून बसली होती. जेव्हा जेव्हा शेखर किंवा शालिनी तिच्यासमोर सुयोगला दत्तक देण्याचा विचार काढत, शारदा कामाचे निमित्त करून तिथून निघून तरी जाई किंवा तो विषय पुढे ढकलत असे. शारदासमोर आपली डाळ शिजणार नाही, असे पाहून शेखरने मालतीबाईंना पुढे करायला सुरुवात केली. पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. शारदाला स्वत:चंच मूल हवं होतं.

शालिनी आणि मालतीबाई हे ’त्यांचं’ कुटूंब होतं. तिच्या आणि देवदत्तांच्या मेडिकल टेस्ट्स, म्हणावं तर पॉझिटीव्ह होत्या, म्हणावं तर निगेटीव्हही होत्या. कधीही मूल होऊ शकतं तर मग मूल होत का नाही? या सर्व विचारांनी शारदाला नैराश्याने घेरलं. थोडी-थोडकी नाही, पुढची पाच वर्षं ती ह्या नैराश्यात वावरत होती. याच नैराश्यातून ती हळूहळू देवाधर्माकडे वळली.

त्या दिवशी, ती अशीच तिच्या व्रताच्या नियमाप्रमाणे देवळात गेली होती. तिथून बाहेर पडता पडता, तिचा मोबाईल वाजला होता. देवळाच्या आवारात नेटवर्क मिळत नाही, म्हणून ती धावतपळत जिथे तिने गाडी पार्क केली होती, तिकडे जाऊ लागली. तिने जेमतेम मोबाईल कानाला लावलाच होता, तोच डाव्या बाजूने येणार्‍या ट्रकच्या हॉर्नच्या कर्कश्श आवाजाने ती दचकली. तिला बाजूला होण्याची उसंतही न देता, तो ट्रक क्षणार्धात तिला तुडवून निघून गेला....

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------