पान ५

“किती लहान आहे ही!.... दिसायलाही चांगली आहे..... वय जास्तीत जास्त बावीस असेल हिचं.... हे काय वय आहे का, तुरूंगात जाण्याचं?.... काय वाढून ठेवलेलं असतं एकेकाच्या नशीबात!.... काय काय चालतं हल्ली कॉल सेंटरमधे..... अरे, हट्‍! हिचीच चूक असणार.....नाईट शिफ्टचा फायदा घेणा-या मुली काही कमी नाहीत....एवढी सुंदर मुलगी रात्रीची एकटी भेटली, तर कोण सोडेल?....”

केस ऐकायला आलेल्या लोकांच्यात प्रियाकडे पाहून दबक्या आवाजात अशी कुजबूज सुरू होती. प्रिया आरोपीच्या पिंजर्‍यात उभी होती. तिच्यापर्यंत वाक्यं पोहोचत नसली तरी जमलेली लोकं काय चर्चा करत असणार याची तिला कल्पना आली होती. अगतिकतेमुळे तिच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. तिने हळूच मान वर करून समीरकडे पाहिलं. समीरही तिच्याचकडे पहात होता. तिची अवस्था त्याला समजली होती. त्याने तिला डोळ्याने खूण करून धिर देण्याचा प्रयत्न केला. समीर सरदेसाई प्रियाचा वकील होता. प्रियाने ’माझ्याकडे वकील नाही’ म्हणताच प्रियाचा वकील म्हणून समीरची नियुक्ती करण्यात आली होती.


आरोपीच्या पिंजर्‍यात उभी असलेली तरूणी प्रिया जगताप हिची कोर्टात आरोपी म्हणून उभं रहाण्याची ही पहिलीच वेळ नाही. ही तरूणी मूळची नाशिकची रहिवासी आहे. ‘घरच्या आर्थिक अडचणींमुळे आपण नाशिक सोडून मुंबईला नोकरी करण्यासाठी आलो,’ असं जरी तिने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं असलं, तरी खरं कारण निराळंच आहे."


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------