पान २८


“सॉरी! मी ठसे देणार नाही.” महेशने गुर्मीत उत्तर दिलं.

“का?”

"कारण मी इथे आरोपीच्या वतीने साक्ष द्यायला आलो होतो. स्वत:ची मान अडकवून घ्यायला नाही."

“असं वाटून घेण्याचं काही कारण नाही मि. ठाकूर. तुमचे ठसे जर कारच्या डिकीवर सापडलेल्या ठशांशी जुळलेच नाहीत तर तुम्ही आपोआपच संशयितांच्या यादीतून बाद व्हाल.”

"तुम्ही... तुम्ही उगीचच मला या प्रकरणात गोवताय."

“या प्रकरणात तुमचा काही दोष नाही ना? मग का आढेवेढे घेताय? उलट तुमच्या बोटांचे ठसे देऊन तुम्हाला तुमचं निरपराधित्व सिद्ध करता येईल." समीर मानभावीपणे म्हणाला.

“तरीही मी ठसे देणार नाही.”

“मि. ठाकूर, प्लीज को-ऑपरेट.” जज्ज सिन्हा म्हणाले तसा महेशचा नाईलाज झाला. दिलीप गुर्जरला ठसे तपासण्यासाठी कोर्टात बोलावलं गेलं.“कोणता प्रश्न.? कोणता प्रश्न...?" ऑडीयन्समधे उत्सुकता दाटून आली होती. जज्ज सिन्हाही प्रश्न ऐकण्यासाठी पुढे झुकले.

“तुम्ही गोरेगावच्या आनंद लॉज मधे सदाशिव बारटक्के या नावाने का उतरला होतात?”

महेशने खाड्कन मान वर करून पाहिलं. त्याच्या हातात रिव्हॉल्व्हर केव्हा आलं हे कुणालाच समजलं नाही.

महेशच्या हातात बंदूक आहे हे समजल्याबरोबर लोक किंचाळत, आरडाओरड करत बाहेर जाण्यासाठी वाट शोधू लागले. एकच गलका झाला. त्याच वेळी जज्ज हातोडा आपटत असताना ’ठो’ असा आवाज झाला आणि समीर खाली कोसळला.

प्रिया भेदरलेल्या चेहेर्‍याने खाली पडलेल्या समीरकडे पहात होती. इन्स्पेक्टर राजे सैरावैरा बाहेर पडणार्‍या लोकांमधून वाट काढत महेश ठाकूरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. महेशच्या हातातील रिव्हॉल्व्हरचा रोखा आता प्रियाच्या दिशेने होता. महेशने ट्रिगर ओढण्यापूर्वीच इन्स्पेक्टर राजेंनी महेशवर झडप घातली.

“मि. सरदेसाई....” बॅ. खंदारे समीरच्या दिशेने धावले.

“मी ठिक आहे.” दिलीप गुर्जरच्या आधाराने उठत समीर म्हणाला. त्याच्या डाव्या खांद्यातून रक्त येत होतं. महेश मारक्या म्हशीने पहावं तसा समीरकडे पहात होता. प्रेस रिपोर्टर्सनी तेवढ्यात फटाफट फ्लॅश मारून घेतले. महेशच्या कृतीने निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे निश्चिरत झालं होतं. आता सर्वांनाच ’नेमकं काय झालं,’ ऐकण्यात इंटरेस्ट होता नि त्यासाठी त्यांना आता कोर्टात हजेरी लावण्याची गरज नव्हती. पुढच्या दोन-तीन दिवसात वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार्‍या या केसच्या बातम्यांतून कळणार होतं ते.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------