पान १५


“प्रिया, तु सांगितलेली हकीकत मी यापूर्वी एकदा ऐकलेली आहे पण मला पुन्हा तीच हकीकत सांगायला तुझी काही हरकत नाही ना?”

“नाही.” प्रिया म्लानपणे हसून म्हणाली, “मी जे तुम्हाला सांगितलं तेच तुम्हाला परत ऐकायचं असेल, तर माझी काहीच हरकत नाही. पण तुम्ही उगाच माझं वकिलपत्र घेतलंत. माझ्या आईवडिलांच्या दृष्टीने मी आता निर्दोष सुटले काय आणि फासावर लटकले काय, दोन्ही एकच.... त्यांच्या माझ्या बोलण्यावर कधीच विश्वास बसला नाही. म्हणून मलाही मी जगले-मेले काहीच फरक पडत नाही.”मनोज ठाकूर हा आमच्याच एरियात राहणारा पण एका श्रीमंत घरातील मुलगा होता. त्याच्या वडिलांचा बिझनेस असूनदेखील त्यांनी मनोजला रेडिमेड गारमेंट्सचं स्वतंत्र दुकान काढून दिलं होतं आणि ते खूप चांगलं चालत होतं. मनोज दिसायलाही देखणा, रुबाबदार होता. श्रीमंत बापाच्या मुलामध्ये असायला हवा तसा वाह्यातपणा त्याच्यात नव्हता. अशा मुलाने जर लग्नाची मागणी घातली तर कुठल्याही मध्यमवर्गीय मुलीला ती नाकारण्याचं काहीच कारण नव्हतं. पण मला त्याची मागणी नाकारावी लागली कारण माझ्या डोळ्यांसमोर एकच ध्येय होतं की बाबांचं कर्ज फिटावं आणि माझ्या लग्नासाठी त्यांना पुन्हा कर्ज काढावं लागू नये.

कॉलेजमधे असताना मनोजने दोन वर्षं निरनिराळ्या प्रकारे मला प्रपोज केलं होतं पण माझा नकार कायम होता. मी त्याला नकाराचं कारण सांगिलं होतं आणि त्यालाही ते पटलं होतं. मित्र म्हणून मनोज खूप चांगला होता. दोन वर्षं तो माझ्यासोबत होता पण एकदाही कधी मला त्याचा ’चुकून’ स्पर्श झाला नाही. त्याने कायम आपल्या मर्यादा सांभाळल्या म्हणूनच माझ्या मनात त्याच्याविषयी आदर होता.

त्यादिवशी त्याने मला भेटायला बोलावलं आणि पुन्हा प्रपोज केलं. माझा नकार तेव्हाही कायम होता. त्या दिवशी त्याला नकार दिल्यावर तो इतकंच म्हणाला, “तुझं उत्तर माहित असूनही तुला हा प्रश्नम वारंवार विचारण्याचा वेडेपणा मी का करतो, माझं मलाच माहीत नाही. तुला कधीही कशाचीही गरज लागली तर माझी फक्त आठवण काढ. जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेन, तरी मी धावत येईन तुझ्यासाठी.”

जाताना मनोजने मला त्याच्याकडे असलेलं लॉकेट गळ्यात घालायला दिलं आणि म्हणाला, “गॉड ब्लेस यू!” नंतर तो जो गेला तो कायमचाच.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------