पान ११


“बरं बरं. मग काय केलंत तुम्ही?”

“काय करणार? माझी तंतरलीच होती. त्या झाडीच्या बाहेर आलो आणि पहिल्यांदा एक शून्य शून्य फिरवलं.

“दॅट्स ऑल युवर ऑनर. क्रॉस.”

“नो क्रॉस.”

समीरने विठ्ठलच्या उलटतपासणीला नकार देताच बॅ. खंदारे आपला पुढचा साक्षिदार बोलावला.

“भार्वव वर्मा.”

तीस-पस्तीशीचा एक तरूण साक्षिदाराच्या पिंजर्‍यात येऊन उभा राहिला. त्याच्या अंगावरच्या कपड्यांवरूनच समजत होतं की तो कॉर्पोरेट जगात वावरणारा आहे.

“नाव?”

“भार्वव वर्मा.”

“काय काम करता?”

“कॉल इंडिया ह्या कॉल सेंटरचच्या ह्युमन रिसोर्सतर्फे कॉल इंडियामध्ये नोकरीसाठी अप्लाय करणार्‍या उमेदवारांची मुलाखत घेण्याचं काम असतं माझ्याकडे.”समीर उलटतपासणी करण्यासाठी उठला.

“मि. वर्मा, तुमच्या कॉल सेंटरतर्फे एम्प्लॉयमेंट चेकींग किंवा बॅक्‌-ग्राउंड चेकींग होत नाही का?”

“होतं ना?”

“मग प्रियाच्या नाशिकच्या केसची माहिती तुमच्या कंपनीला कशी मिळाली नाही?”

“प्रिया फ्रेशर होती त्यामुळे एम्प्लॉयमेंट चेकींगचा प्रश्नच नव्हता. बॅक्‍ ग्राऊंड चेकींगसाठी प्रियाने जे रेफरन्सेस दिले होते, त्या तिन्ही व्यक्तींनी प्रियाच्या केसचा उल्लेखच केला नाही, तर आमहाला तरी कसं काय कळणार?”

“जर प्रियाच्या नाशिकच्या केसची बातमी तुम्हाला समजली असती, तर तुम्ही प्रियाला नोकरीवरून काढलं असतं?”

“वेल...नाही. कारण प्रिया त्या केसमधून निर्दोष सुटलेली आहे. आम्ही फक्त गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेल्या व्यक्तींना नोकरी नाकारतो.”

“अच्छा! मग मला सांगा मि. वर्मा. प्रियावर नाशिकला एक केस झाली आहे आणि ती त्या केसमधून निर्दोष मुक्त झाली आहे, हे तुम्हाला कसं समजलं?”

वर्मा खंदार्‍यांकडे पहात होता. खंदारे समीरकडे पहात होते आणि समीर त्या दोघांकडे आळीपाळीने पहात होता.

“सरकारी वकीलांकडे काय पहाताय मि. वर्मा? ते ह्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत का?” समीरने हसत विचारलं.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------